बलात्कार-हत्येच्या आरोपीचा एन्काउंटर
बंगालमधील प्रकरण : पोलिसांकडील शस्त्र हिसकावून केला गोळीबार
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या बरुईपूरमध्ये 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करत तिची हत्या करणारा आरोपी प्रभास मंडल पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला आहे. गुन्ह्याचे दृश्य रिक्रिएट करण्यादरम्यान आरोपीने पोलिसांकडील शस्त्र हिसकावून घेत गोळीबार केला होता, ज्यानंतर पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत तो मारला गेला आहे.
बरुईपूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आरोपी प्रभास मंडल एन्काउंटरमध्ये मारला गेल्याची पुष्टी पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. 8 जुलै रोजी सुमारे 12.45 वाजता बरुईपूर पोलीस स्थानकात नोंद गुन्ह्dयाचे तपास अधिकारी स्वत:ची टीम आणि आरोपी प्रभास मंडलसोबत सूर्यापूरमध्ये गुन्हा घडलेल्या स्थळी पोहोचले होते.
तेथे क्राइम सीनला रिक्रिएट करविण्यात आले. तेव्हा आरोपी प्रभासने एका पोलीस कर्मचाऱ्याकडील शस्त्र हिसकावून घेतले आणि पोलिसांवर गोळीबार करत पळ काढण्याचा प्रयतन केला. पोलिसांच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत आरोपी जखमी झाला आणि त्याला त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
एसआयटीची स्थापना
दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बरुईपुरमध्ये 5 जुलै रोजी 12 वर्षीय मुलीचा मृतदेह तलावातून हस्तगत करण्यात आला होता. पीडितेची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशीसाठी शुभेंदु सरकारने एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीला काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे हाती लागले होते. गुन्ह्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.
यूपी 2.0 मध्ये स्वागत!
एन्काउंटरप्रकरणी तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. बरुईपूर बलात्कार-हत्येचा आरोपी प्रभास मंडल एन्काउंटरमध्ये मारला गेला. बंगाली लोकांनो उत्तरप्रदेश 2.0 मध्ये तुमचे स्वागत आहे. भाजपचे हे सरकार नव्हे तर जंगलराज असल्याची टीका मोइत्रा यांनी केली आहे.