बालिकेवर अत्याचार करणाऱ्याचा एन्काऊंटर
हुबळी तारिहाळ पुलाजवळील घटना : बालिकेचा शेडमध्ये आढळला मृतदेह
बेळगाव : घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिचा खून करणाऱ्या बिहारी युवकाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी हुबळीजवळील तारिहाळ पुलानजीक हा एन्काऊंटर झाला आहे. या घटनेने हुबळीत एकच खळबळ माजली आहे. रितेशकुमार (वय 35) राहणार बिहार असे त्याचे नाव आहे. अशोकनगरच्या पोलीस उपनिरीक्षक अन्नपूर्णा यांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. रविवार दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास अध्यापकनगर-हुबळी येथील पाच वर्षांची बालिका बेपत्ता झाली होती. घराजवळच असलेल्या एका शेडमध्ये तिचा मृतदेह आढळून आला.
सीसीटीव्हीचे फुटेज व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी रितेशकुमारला ताब्यात घेतले. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी त्याला घेऊन गेले होते. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक करून पलायनाचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला किम्स इस्पितळात हलवण्यात आले. त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी सांगितले. रितेशकुमारच्या हल्ल्यात यशवंत मोरब व वीरेश हे पोलीसही जखमी झाले आहेत. आरोपी मूळचा बिहारचा आहे. तारिहाळ पुलाजवळील एका शेडमध्ये तो रहात होता.
त्याच्यासोबत आणखी कोण राहतात, हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्याला शेडजवळ नेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. रविवारी सकाळी 5 वर्षीय बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून रितेशकुमारने तिला आपल्या शेडमध्ये नेले. त्या बालिकेशी त्याने असभ्य वागणूक केली आहे. शेवटी त्याने तिचा खून केला आहे. बालिकेचा मृतदेह दिसून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याचवेळी संतप्त नागरिकांनी आरोपीवर कारवाई करावी, या मागणीसाठी धरणे धरले होते. एन्काऊंटरमध्ये त्याचा खात्मा केल्याचे समजताच धरणे मागे घेऊन पोलिसांचा जयजयकार करण्यात आला.