मुख्तार अन्सारी टोळीतील शूटरचे एन्काउंटर
झारखंडमध्ये लपला होता : चकमकीत दोन्ही बाजूंनी 60 राउंड गोळीबार, डीएसपी शाही जखमी
वृत्तसंस्था/ रांची
उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’ने मुख्तार अन्सारीच्या टोळीतील शूटर अनुज कनौजियाला एन्काउंटरमध्ये ठार केले. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसटीएफ आणि झारखंड पोलीस अनुज कनौजियाला अटक करण्यासाठी शनिवारी रात्री जमशेदपूरला पोहोचल्यानंतर चकमक झाल्याचे एडीजी अमिताभ यश यांनी सांगितले. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत 60 हून अधिक राउंड गोळीबार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
उत्तर प्रदेश एसटीएफ आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने जमशेदपूरमध्ये झालेल्या चकमकीत मुख्तार अन्सारी टोळीचा कुख्यात गुन्हेगार अनुज कनौजिया याला ठार मारले. अनुज कनौजिया याने उत्तर प्रदेशातून पळून जात झारखंडमधील जमशेदपूरमध्ये आश्रय घेतला होता. अनुजविरुद्ध खून, दरोडा, खंडणी आणि गुंडगिरी असे 20 हून अधिक गुन्हे दाखल होते. अनुज कनौजिया हा उत्तर प्रदेशातील अनेक गंभीर प्रकरणांमध्ये हवा होता. अनुज कनौजियावर अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. चकमकीनंतर अनुजच्या लपण्याच्या ठिकाणाहून अनेक शस्त्रs आणि आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
अनुज कनौजिया सध्या झारखंडमधील जमशेदपूर येथे राहत असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली होती. त्याचे लोकेशन मिळाल्यानंतर झारखंड एटीएसच्या मदतीने अनुजला अटक करण्यासाठी पथक शनिवारी रात्री उशिरा जमशेदपूरमधील गोविंदपूरजवळील जनता मार्केटमध्ये पोहोचले. संयुक्त पथकाने त्याला घेरल्यानंतर अनुजने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याची सूचना केली. पण तो पोलिसांवर गोळीबार करत राहिला. या गोळीबारात उत्तर प्रदेश पोलिसांचे डीएसपी धर्मेंद्र कुमार शाही यांना गोळी लागली. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असता शूटर अनुज कनौजिया ठार झाला.
अनुज हा उत्तर प्रदेशातील मऊ जिह्यातील चिरैयाकोटचा रहिवासी होता. त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील मऊ जिह्यात सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच आझमगड आणि गाजीपूरच्या पोलीस ठाण्यात गुंड कायदा, शस्त्र कायदा, गुंडा कायदा इत्यादी अंतर्गत दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.