झारखंडच्या चाईबासामध्ये चकमक, 4 नक्षली ठार
दोन नक्षलवाद्यांना अटक : अनेक रायफल्स हस्तगत
वृत्तसंस्था/ चाईबासा
झारखंडच्या चाईबासामध्ये पोलिसांनी एका चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मृतांमध्ये नक्षलींचा झोनल कमांडर, सब-झोनल कमांडर आणि एरिया कमांडर सामील आहे. तर दोन एरिया कमांडर्सना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर त्यांच्याकडून अनेक रायफल्स हस्तगत करण्यात आल्या आहेत. टोंटो आणि गोइलकेरा भागानजीक ही चकमक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चकमकीत 4 नक्षलवादी मारले गेले असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती झारखंडचे पोलीस महासंचालक अमोल होमकर यांनी दिली आहे. पोलिसांचे पथक शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 4 नक्षलवादी मारले गेले आहेत अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
अमली पदार्थ हस्तगत
झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात पोलिसांनी 155 किलो वजनाच्या अमली पदार्थांसह 4 जणांना अटक केली आहे. या अमली पदार्थांची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अमली पदार्थांची एक मोठी खेप ओडिशातून उत्तरप्रदेश येथे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच्याच आधारावर कारवाई करण्यात आल्याचे सिमडेगा पोलीस अक्षीधकांकडून सांगण्यात आले.