For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंदिरांच्या भूमींचे भूमाफियांपासून रक्षणासाठी कठोर कायदा करा

05:42 PM Nov 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मंदिरांच्या भूमींचे भूमाफियांपासून रक्षणासाठी कठोर कायदा करा
Advertisement

मंदिर विश्वस्तांचे शासनाला निवेदन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

 हिंदु संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या मंदिरांच्या भूमी भूमाफियांकडून हडप केल्याच्या तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी किमतीच्या जमिनींची कवडीमोल किंमतीत विक्री केल्याच्या घटना महाराष्ट्रात उघड होत आहेत. मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी 'अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट' कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी  मंगळवारी सावंतवाडी तालुक्यात महाराष्ट्र मंदिर महासंघासह  मंदिर विश्वस्तांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन दिले. निवासी नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर यांनी निवेदन स्वीकारले हा कायदा तात्काळ लागू करण्यासह विशेष तपास पथके (SIT) स्थापन करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनाही हे निवेदन देण्यात आले.देवस्थान इनाम जमिनी या कायद्याने अहस्तांतरणीय असूनही, भूमाफियांनी स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात जमिनी हडपल्या आहेत. इनाम रजिस्टर आणि गाव नमुना ३ मध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून देवस्थानांची नावे वगळण्यात आली आहेत. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियममधील कलम ८८ नुसार देवस्थान जमिनींना मिळालेले संरक्षण डावलून, कुळांच्या नावाखाली एक-एक करून हजारो एकर जमिनी छुप्या पद्धतीने गिळंकृत करण्याचा सपाटा चालू आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात जमीन हडपणे, हा गंभीर फौजदारी गुन्हा मानणारा सक्षम कायदाच नाही. याउलट, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आसाम यांसारख्या राज्यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून अनेक वर्षांपूर्वीच फौजदारी स्वरूपाचा 'अँटी लॅन्ड ग्रॅबिंग ॲक्ट (जमीन हडप विरोधी कायदा)' लागू केला आहे. याच प्रकारे असा दखलपात्र व अजामीनपात्र स्वरूपाचा कायदा महाराष्ट्रातही लागू करावा. विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून महाराष्ट्रातील मागील २० ते २५ वर्षांतील सर्व देवस्थान जमीन हस्तांतरण प्रकरणांची सखोल चौकशी करावी. या कायद्यांतर्गत खटले चालवण्यासाठी प्रत्येक विभागात विशेष जलदगती न्यायालये स्थापन करावीत. खटले सहा महिन्यात निकाली काढावेत. जेणेकरून देवस्थानांना त्वरित न्याय मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे.'महाराष्ट्र मंदिर महासंघा'ने विदर्भातील अमरावती, अकोला आदी जिल्ह्यांतील अनेक देवस्थानांच्या बळकावलेल्या अनेक एकर जमीन देवस्थानला मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा दिला आहे. देवस्थानांच्या जमीनी बळकावण्याच्या प्रकारांविरोधात शासनाने पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे देवस्थानांचे रक्षण करण्याची कणखर व ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे.यावेळी बाळासाहेब बोर्डेकर, (सावंतवाडी ) मधुकर देसाई (डेगवे )सुनील परब (कुणकेरी) मंथन गवस,(वाफोली )सखाराम शेर्लेकर (शेर्ले) राजेंद्र सावंत, (डिगणे ) जयेश सावंत,दिनेश सावंत, बाळा डांगी,जीवन केसरकर, शिवराम देसाई, शंकर निकम, दत्तातरम सावंत, रघुनाथ सावंत, दिलीप आटलेकर, आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.