धर्मांतरणा विरोधी कडक कायदा करा
सांगली :
धर्मांतरण विरोधी तत्काळ कडक कायदा करावा, अशी मागणी हिंदू सकल समाजाच्यावतीने करण्यात आली. कुपवाड येथील सात महिन्याची गरोदर असणाऱ्या ऋतुजा राजगे हिने धर्मांतरणाविरूध्द आवाज उठवत आत्महत्या केली आहे. धर्मांतरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना यापुढे तुडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी यावेळी दिला.
पडळकर म्हणाले, ऋतुजा राजगे ही उच्चशिक्षीत मुलगी होती. ती एमपीएससी करणारी होती. पण त्याचवेळी कुपवाड येथे तिला हे हिंदू-धनगर समाजाचे हे स्थळ आले आणि उच्चशिक्षित असणाऱ्या या कुटुंबाबरोबर तिचे लग्न झाल्यावर तिला समजले की या कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यानंतर तिच्यावर धर्मांतरण करण्यासाठी प्रयत्न केला पण तिने साथ दिली नाही त्यामुळे तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि यामुळेच तीने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून हत्त्याच आहे. त्यामुळे तिच्या पतीसह सासू-सासरे आणि ज्यांने लग्न ठरविले तो नायब तहसिलदार तसेच पास्टर यांनाही सहआरोपी करा, अशी मागणी करत आहोत.
राज्यशासनाने धर्मांतरण विरोधी करणारा कायदा तात्काळ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दररोज लव्हजिहादचे प्रकरण बाहेर पडत आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी धर्मांतरण विरोधी कायदा गरजेचा आहे तो करणारच असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, या प्रकरणांत पोलिसांनीही तत्काळ कारवाई केली नाही. धर्मांतरणबाबत त्यांनी गुन्ह्यात नोंद घेतली नाही त्यामुळे कुपवाड पोलिसांची कारवाई संशयास्पद वाटते. त्यामुळे त्या पोलीसांवरही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
जुने स्टेशन चौक ते राममंदिर चौक असा हा कँडल मोर्चा निघाला त्यानंतर याठिकाणी विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच हिंदू धर्मावर जे अत्याचार होत आहेत आणि आक्रमणे होत आहेत. याला कडक उत्तर देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाजाच्या महिला आणि युवक सहभागी झाले होते.