‘रूह’ चित्रपटात इम्रान हाश्मी
इम्रान हाश्मीचे चित्रपट अन् गाण्यांचा चाहतावर्ग वेगळा आहे, याचमुळे त्याने सवत:च्या चाहत्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. परंतु यावेळी तो रोमान्सच्या जागी भयपटात दिसून येणार आहे. इम्रानने म्युझिकल हॉररपट रूह चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असेल, हा चित्रपट पुढील वर्षी हिंदीसोबत तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. रूह चित्रपटाचा टीझर जारी करण्यात आला आहे. रूह असा चित्रपट आहे, ज्याने मला अत्यंत प्रभावित केले आहे, कारण यात नव्या काळातील हॉरर, इमोशन आणि संगीताचा अत्यंत जबरदस्त मिलाप असल्याचा दावा इम्रानने केला आहे. रूह चित्रपटाची कहाणी मयंक शर्मा आणि विशाल कपूर यांनी लिहिली आहे. या दोघांना ‘लुकाछिपी’ आणि ‘छोरी’ चित्रपटांच्या कहाण्यांसाठी ओळखले जाते. रूह चित्रपटाचे दिग्दर्शन मयंक शर्मा करणार आहे. इम्रान हा पुढील काळात आवारापन 2 चित्रपटात दिसून येणार आहे. हा एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट असेल. 2007 मध्ये प्रदर्शित आवारापन चित्रपटाचा हा सीक्वेल 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.