For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोजगारातील संधी आणि दर्जेदार रोजगार

06:35 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
रोजगारातील संधी आणि दर्जेदार रोजगार
Advertisement

‘रायटर’ने भारताच्या आर्थिक प्रगतीच्या संदर्भात गेल्या आर्थिक वर्षासाठी केलेल्या सर्वेक्षणामध्ये या कालावधीत भारताची आर्थिक प्रगती सुमारे 8 टक्के असल्याचे आवर्जून नमूद केले असतानाच तुलनेने रोजगार संधी कमी प्रमाणात असल्याचे नमूद केले आहे. मात्र याच सर्वेक्षणातील तपशिलात नमूद केल्यानुसार सध्या भारतात रोजगार संधींची कमतरता नसून विद्यार्थी युवकांसाठी त्यांच्या इच्छा-अपेक्षांनुरुप रोजगार मिळत नसल्याचे प्रामुख्याने लक्षात आले आहे. हे मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला असून यातूनच दर्जेदार रोजगारांची उपलब्धता नसणे हा नवा व महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला आहे.

Advertisement

याच संदर्भात ‘प्राईस’च्या आइस 360 टक्के या अभ्यासानुसार सध्या देशात  नोकरी-रोजगार करणाऱ्या व विविध पदांवर कार्यरत असणाऱ्यांपैकी लक्षणीय संख्येतील म्हणजेच सुमारे 40 टक्के अधिकारी-कर्मचारी हे त्यांच्या प्रचलित नोकरी-रोजगाराच्या संदर्भात समाधानी नाहीत. या कर्मचाऱ्यांच्या असमाधानी असल्याचे मोठे व महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना मिळणारे पगार, वेतन आणि फायदे त्यांच्या अपेक्षेनुरुप नाही. अशी भावना असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय स्वरुपात व सुमारे 64 टक्के या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

त्या खालोखाल आपल्या सध्याच्या नोकरी रोजगाराबद्दल समाधानी नसणाऱ्यांपैकी 14 टक्के जणांनी पगार, वेतनातील अनियमितता तर 6 टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांना व्यवस्थापनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा विषयक तरतुदी पुरेशा नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सकृतदर्शनी राहत्या घरापासून कार्यालय वा कामाचे ठिकाण यामधील वाढते अंतर व त्यासाठी दररोज ये जा करण्यासाठी लागणारा मोठा कालावधी व परिश्रम या मुद्द्यांचा उल्लेख प्रतिसाद देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून या अभ्यासात झालेला नाही. असे असले तरी भारतातील कर्मचारी कामगारांपुढील प्रमुख व जिव्हाळ्याचे मुद्दे यातून स्पष्ट होतात.

Advertisement

वर नमूद केलेले समस्यावजा मुद्दे हे केवळ असंघटित क्षेत्रातील अथवा मध्यम स्वरुपातील उद्योग आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांशीच संबंधित आहेत, असे नाही. उलट संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पण या समस्यांचा सामना करावा लागतो, असे स्पष्ट झाले आहे. अभ्यासातील निष्कर्षात नमूद केल्यानुसार प्रस्थापित उद्योगातील काम करणाऱ्या व भविष्य निर्वाहनिधी, आरोग्य विमा, ग्रॅच्युइटी यासारखे वेतनासह लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांना मिळणारे वेतन व त्याच्याशी निगडित फायदे त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी वाटतात. अभ्यासात नमूद केल्याप्रमाणे  अशा कर्मचाऱ्यांची टक्केवारी सुमारे 35 टक्के आढळून आली.

त्याच दरम्यान देशांतर्गत संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 25 टक्के कर्मचाऱ्यांना अद्यापही आरोग्य व सामाजिक सुरक्षा विषयक फायदे अद्यापही मिळत नसल्याचे दिसून येते. यामुळे या कामगार-कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन तर मिळते पण त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांची  पूर्तता होत नसल्याची भावना त्यांच्यामध्ये कायमस्वरुपी राहते.

या सर्व मुद्द्यांवरून देशांतर्गत कर्मचारी कामगार म्हणून काम करणाऱ्यांमध्ये प्रचलित अपेक्षांनुसार त्यांना मिळणारे वेतन, इतर सोयी व अप्रत्यक्ष आर्थिक फायदे इ. संदर्भात असमाधान असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळेच या मंडळींचा स्वाभाविक कल हा केवळ नोकरी रोजगार मिळविणेच नव्हे तर त्याच्या जोडीला सध्या मिळणाऱ्या  पगारापेक्षा अधिक वेतन, पगार व फायदे मिळणे यावर असतो. कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील बदलांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचे कारण ठरते.

याच्याच जोडीला नोकरी, रोजगार मिळाल्यानंतर पदोन्नतीसह प्रगती व त्यातून पगारवाढ यावर कंपन्यांमधील  प्रचलित कर्मचाऱ्यांचा स्वाभाविकपणे भर असतो. ज्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामकाज व क्षमतेनुसार त्यांना पगारवाढ व पदोन्नती दिली जाते अशा ठिकाणी कर्मचारी साधारणत: तुलनेने अधिक वा बरेचदा दीर्घकालीन  स्वरुपात कायम राहतात. यातून असे कर्मचारी व कंपनी या उभयतांची प्रगती होत जाते.

त्यामुळेच अशा मुलभूत व महत्त्वाच्या मुद्द्यांवर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी कंपनी व  कर्मचारी या उभयतांना फायदेशीर निर्णय घेऊन त्याची दीर्घकालीन व धोरणात्मक स्वरुपात अंमलबजावणी करणे उभयपक्षी फायदेशीर ठरू शकेल. यातून कंपनी व्यवस्थापनाला कार्यक्षम कामगार कर्मचारी तर कर्मचाऱ्यांना समाधानकार रोजगार संधी मिळू शकतील.

यासाठी अर्थातच संबंधित कंपनी व उद्योगाचा आर्थिक व्यावसायिक विकास होण्याच्या जोडीलाच स्थायी स्वरुपात आर्थिक विकास साधून त्यातून कामगार कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन स्वरुपात फायदे होण्यासाठी पुढील उपाययोजनांचा विचार करता येईल.

शिक्षण व कौशल्याला प्रगत तंत्रज्ञानाची साथ : आपल्याकडे शिक्षणाची सांगड प्रामुख्याने शैक्षणिक पात्रता व अभ्यासक्रमाशी घातली जाते. विद्यार्थ्यांपासून विद्यापीठापर्यंत साधारणपणे हीच भूमिका असते. या मानसिकतेला कौशल्य विकासाची जोड देऊन प्रचलित पात्रताधारक विद्यार्थ्यांना कौशल्यप्रवण व रोजगारक्षम बनविणे खऱ्या अर्थाने आवश्यक आहे.

रोजगार क्षम उद्योग- व्यवसायांना चालना व प्राधान्य देणे :  प्रत्येक उद्योग-व्यवसायातून रोजगारनिर्मिती होत असते. यातील रोजगार निर्मितीचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. मात्र तुलनेने मोठ्या प्रमाण व स्वरुपात रोजगार निर्मितीसाठी रोजगाराभिमुख व अधिकाधिक रोजगारप्रवण उद्योग व्यवसायांना चालना देणे गरजेचे ठरते. यातून पुढे अनुभवी उमेदवार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार व म्हणजेच दर्जेदार, मनाजोगते रोजगार मिळू शकतात हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व विकास- प्रचलित व नव्याने येणाऱ्या रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देऊन त्यांचा कौशल्यांसह गुणात्मक विकास करणे फार महत्त्वाचे असल्याने प्रत्येक व्यवस्थापन व व्यवस्थापकांनी यावर भर देणे महत्त्वाचे ठरते. यातूनच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व उद्योगाची विकास क्षमता या उभयतांची वाढ होते.

धोरणात्मक निर्णय व अंमलबजावणी- उद्योगांतर्गत व्यवसाय प्रक्रियेसाठी आवश्यक अशा प्रचलित व प्रस्तावित गरजा लक्षात घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सक्षम व प्रेरित होऊन कार्यरत होण्यासाठी व्यापक स्वरुपात व कंपनी स्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. तसे नियोजन व सातत्यपूर्ण प्रयत्न फार महत्त्वाचे  ठरतात. आज नव्याने नोकरी, रोजगार क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या नव्या पिढीला नोकरी, रोजगाराच्या जोडीलाच  पगार-पगारवाढ  व प्रगतीचा ध्यास लागलेला आहे. यालाच प्रचलित परिभाषेत नवागतांच्या अपेक्षेपलिकडे जाऊन वाढत्या अपेक्षा-आकांक्षाची जोड प्राप्त झाली आहे. त्यामुळे आज कर्मचाऱ्यांच्या आकांक्षांची पूर्तता करण्याचे नव्हे आव्हान निर्माण झाले आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.