संघटीत क्षेत्रात रोजगार वाढला
सप्टेंबरमध्ये 17.21 लाख सदस्यांची जोडणी : कामगार मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ईपीएफओने सप्टेंबरमध्ये 17.21 लाख सदस्य जोडले आहेत. नियमित पगारावर ठेवलेल्या लोकांबाबत जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.
कामगार मंत्रालयाने सादर केलेल्या निवेदनानुसार, मासिक आधारावर, या वर्षी ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये एकूण 21,475 नवीन सदस्य ईपीएफओमध्ये समाविष्ट झाले आहेत. तर वार्षिक आधारावर, सप्टेंबर 2022 च्या तुलनेत, या वर्षी त्याच महिन्यात 38,262 नवीन सदस्य जोडले गेले.
मंत्रालयाने सांगितले की सप्टेंबरमध्ये सुमारे 8.92 लाख नवीन सदस्य ईपीएफओ योजनांमध्ये सामील झाले. नवीन सदस्यांपैकी 58.92 टक्के सदस्य हे 18 ते 25 वयोगटातील आहेत. यावरून असे दिसून येते की, कर्मचारी वर्गात सहभागी असलेल्या सदस्यांमध्ये मोठ्या संख्येने तरुण आहेत. यापैकी अनेक जण असे आहेत ज्यांना पहिल्यांदाच नोकरी मिळाली आहे.
निवेदनानुसार, या सदस्यांनी आपली नोकरी बदलली आणि ईपीएफओच्या अखत्यारीतील आस्थापनांमध्ये पुन्हा रुजू झाले. या लोकांनी अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करण्याऐवजी त्यांनी ईपीएफओ नवीन संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडला आहे. आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये 3.67 लाख सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडले. मागील महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 12.17 टक्के कमी आहे. ईपीएफओमधून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची संख्या जून 2023 पासून कमी होत आहे. मंत्रालयाने सांगितले की, या महिन्यात 8.92 लाख नवीन सदस्य सामील झाले आहेत.
या राज्यात रोजगार वाढले
तसेच, सुमारे 3.30 लाख महिला ईपीएफओशी संबंधित आहेत. ‘पेरोल’च्या राज्यवार आकडेवारीवर नजर टाकल्यास, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्ये सर्वाधिक सदस्य जोडले गेले. निव्वळ जोडलेल्या सदस्यांच्या संख्येत त्यांचा वाटा 57.42 टक्के आहे. या राज्यांनी 9.88 लाख सदस्य जोडले. आकडेवारीनुसार, साखर उद्योग, कुरिअर सेवा, लोह आणि पोलाद, रुग्णालये, ट्रॅव्हल एजन्सी इत्यादींमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय वाढली आहे.