रोजगार हमी ठरतेय अंध-दिव्यांगांना आधार
कामात सहभाग वाढू लागला, शारीरिक क्षमतेनुसार काम : काही ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात अंमलबजावणी, मजुरीतही वाढ
बेळगाव : अकुशल कामगारांचा आर्थिक स्तर उंचावणारी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनेतून अंध, दिव्यांग व वयोवृद्धांनाही आधार मिळू लागला आहे. त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम मिळत असल्याने अंध आणि दिव्यांगांचा रोजगार हमीमध्ये सहभाग वाढू लागला आहे. जिल्ह्यात 11797 दिव्यांगांची रोजगार हमी योजनेसाठी नोंद झाली आहे. संबंधितांना जॉबकार्ड देण्यात आली आहेत. अशा कामगारांना अधिक मानवदिवस काम देण्याचे अपेक्षित आहे. अंध-दिव्यांगांना शारीरिक क्षमतेनुसार काम दिले जाते. दरवर्षी रोहयो कामात नवीन अंध-दिव्यांग कामगारांची भर पडत आहे. इतर कामगारांना कठोर परिश्रमाचे काम असले तरी अंध-दिव्यांगांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार काम दिले जात आहे. जॉबकार्ड सांभाळणे, रोहयो कामगारांना पाणी देणे आणि इतर हलकी कामे दिली जात आहेत.
शंभर दिवस काम देणे बंधनकारक
शासनाने रोहयोमध्ये अंध-दिव्यांग आणि वयोवृद्धांनाही काम उपलब्ध करून द्यावे, असा आदेश दिला आहे. त्यानुसार काही ग्रा. पं.कार्यक्षेत्रात याची अंमलबजावणी होऊ लागली आहे. त्यामुळे रोहयो कामावर आता अंध-दिव्यांगही दिसून येत आहेत. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला शंभर दिवस काम देणे बंधनकारक आहे. शिवाय मजुरीतही वाढ केली आहे. 309 वरून मजुरी आता 350 रुपये केली आहे. त्यामुळे या कामासाठी मजुरांची पसंती मिळू लागली आहे.
दिव्यांग रोहयो कामगारांची संख्या
- तालुके दिव्यांग कामगार
- बेळगाव 942
- खानापूर 1287
- चिकोडी 654
- गोकाक 624
- हुक्केरी 686
- कागवाड 153
- कित्तूर 440
- मुडलगी 266
- निपाणी 391
- रामदुर्ग 949
- रायबाग 887
- सौंदत्ती 2240
- अथणी 1133