'झोया मरीन' बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० बोटी बनवण्याचे काम तळवणे गावात होणार असून, स्थानिक २०० युवक-युवतींना याच भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. रिव्हर्स मायग्रेशनची ही सुरुवात असून, आरोंदा जेटी व रेडी बंदर तसेच ताज पंचतारांकित प्रकल्पदेखील लवकरच मार्गी लागणार आहेत. आता विरोधाला थारा न देता येथील लोकांनी विकासाची सवय लावून घ्यावी, आशावादी होऊन विकासाला साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
राज्यात काहीजण या जिल्ह्याबद्दल काहीही माहिती नसताना जमीन व्यवहारावरून जिल्ह्याची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत. मात्र, त्यांना उत्तर देत बसण्यापेक्षा कामातून उत्तर देण्याचा निश्चय मी केला आहे. खा. नारायण राणे यांनी अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले. त्यातील चिपी विमानतळ, मुंबई-गोवा महामार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले, तर सी वर्ल्ड व अन्य प्रकल्प विरोधासाठी विरोध झाल्याने अपूर्ण राहिले. त्यामुळे जेव्हा पालकमंत्री झालो, तेव्हाच येथील लोकांसाठी जिल्ह्यातच रोजगार उत्पन्न करून देण्याचा निर्धार केला.
आतापर्यंत आपली मुले गोव्यात जात होती. मात्र, आज गोव्यातील कंपनी महाराष्ट्रात आणण्याचे काम आम्ही केले आहे. गोवा, कर्नाटकपेक्षा मोठी गुंतवणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्याचा शब्द त्यांनी दिला असून, महाराष्ट्र सरकारकडून त्यांना संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.
झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने या ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, झोया मरीनचे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवारीया, डॉ. निलेश बाणवलीकर, युवराज लखमराजे भोंसले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सातोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शर्वाणी गावकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, पंचायत समिती सदस्या स्नेहा कांबळे, तळवणे सरपंच गोविंद केरकर, उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शेखर गावकर, सिद्धेश कांबळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, तळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.