कचरा उचलण्यावरून कर्मचारी-नागरिकांमध्ये वादावादी
सुका-ओला कचरा वर्गीकरण करून देण्याची मागणी
बेळगाव : मनपा आयुक्तांनी सुका व ओला कचरा स्वतंत्र गोळा करण्याचा आदेश बजावला. परंतु यामुळे नागरिक व कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होत आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरण करून न ठेवल्यास कचऱ्याची उचल केली जात नसल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांने शाब्दीक खटके उडत आहेत. त्यामुळे एक तर संपूर्ण शहरात जागृती करावी अन्यथा ही मोहीम थांबविण्याची मागणी करण्यात येत आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून दिल्यास त्याचे विल्हेवाट लावणे सोयीचे ठरते. त्यामुळे मागील आठवड्यात मनपा आयुक्ता शुभा. बी यांच्या आदेशानुसार ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यास सुरूवात करण्यात आली. या मोहिमेची सुरूवात वडगाव भागातून करण्यात आली. ओला व सुका कचरा वर्गीकरण केल्याने तुरमुरी कचरा डेपोत वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ होत होती.
कचरा वर्गीकरण करून दिल्यास मनपाला फायदा
आयुक्तांच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांनी कचऱ्याची उचल वर्गीकरण करूनच करण्यास सुरूवात केली. परंतु काही ठिकाणी नागरिकांनी कचरा वर्गीकरण करून न दिल्यास उचल केली जात नसल्याचे दिसून आले. कचरा उचल होत नसल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होत आहे. वास्तविक नागरिकांनाही ओला व सुका कचरा वर्गीकरण करून दिल्यास याचा फायदा मनपाला होणार आहे.