For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामीण वाहतूक सुविधा सक्षम करण्यावर भर

11:18 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्रामीण वाहतूक सुविधा सक्षम करण्यावर भर
Advertisement

परिवहनमंत्री रामलिंगारेड्डी : कित्तूर येथे नूतन बसस्थानकाचे उद्घाटन

Advertisement

बेळगाव : राज्यातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सरकार विविध लोकहिताच्या योजना राबवत आहे. ग्रामीण भागात वाहतूक सुविधा सक्षम करण्यावर विशेष भर दिला जात आहे. सुमारे 5 कोटी खर्चातून कित्तूर येथे नूतन बसस्थानक उभारण्यात आले असून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. याठिकाणी पेट्रोलपंप उभारण्यासाठीही लवकरच पावले उचलली जातील, असे प्रतिपादन परिवहनमंत्री रामलिंगारेड्डी यांनी केले.

सोमवारी नव्याने उभारण्यात आलेल्या कित्तूर बसस्थानकाचे उद्घाटन व नूतन बसेसच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, परिवहनमंत्री म्हणून आपल्या मागील कार्यकाळात राज्यभरात अनेक बसस्थानके उभारण्यात आली. सध्याच्या सरकारच्या काळात दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत 1200 नवीन बसेस परिवहन विभागात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. बेळगावमधील मध्यवर्ती व शहर बसस्थानकांचे उद्घाटन यापूर्वीच झाले असून कित्तूर बसस्थानकामध्येही लवकरच काँक्रिटचे काम पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

नव्याने सुरू करण्यात आलेल्या या बसबस्थानकाला 15 नवीन बसेस देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील नागरिक, विशेषत: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था स्थिर होणार असून नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. परिवहनचे ग्रामीण भागात जाळे निर्माण करण्यात येणार असून नागरिकांना अडचणीविना वाहतूक सुविधा पुरविण्यात येणार आहे, असेही रामलिंगारेड्डी यांनी सांगितले.

आमदार  बाबासाहेब पाटील म्हणाले, कित्तूर बसस्थानक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या याठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ वाहतूक सुविधा देण्यासाठी हे बसस्थानक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आता 15 नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार बाबासाहेब पाटील यांनी बसस्थानकातील उर्वरित कामे लवकर पूर्ण करून स्थानिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त निधी आणि नूतन मिनी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी परिवहनमंत्री रामलिंगारेड्डी यांच्याकडे केली. यावेळी वायव्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष सुनीला हनुमन्नवर, गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी, परिवहन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रियंगा एम., अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसर्गी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.