द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर
युएई दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी घेतली शेख मोहम्मद बिन रशीद यांची भेट
वृत्तसंस्था/ दुबई
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुबईमध्ये युएईचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची भेट घेतली. यादरम्यान, नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, अवकाश, शिक्षण आणि परस्परांमधील संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तृत क्षेत्रांवर चर्चा केली. यादरम्यान, नेत्यांनी भारत आणि यूएईमधील वेगाने वाढणाऱ्या आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांवर समाधान व्यक्त केले. तसेच सर्वसमावेशक आर्थिक भागिदारी करारासाठी उचललेल्या पावलांवर आनंद व्यक्त केला. द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरीचेही त्यांनी स्वागत केले.
दुबईत राहणाऱ्या भारतीय समुदायाप्रती उदारता दाखवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांचे आभार मानले. बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी दुबईला व्यापार, सेवा आणि पर्यटनाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यात भारतीय डायस्पोराच्या योगदानाचे कौतुक केले. दुबईत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारत मार्टचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हेदेखील उपस्थित होते. युएईसोबत अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर आणि ‘अहलान मोदी’ कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी काही भारतीय संघटनांच्या प्रतिनिधी आणि मान्यवरांशीही चर्चा केली.
मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीमध्ये मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्याशी द्विपक्षीय बैठक केली. मादागास्करचे अध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्यासोबत झालेल्या दुसऱ्या भेटीत मोदींनी भारत-मादागास्कर भागिदारी आणखी मजबूत करण्याच्या आणि बेट राष्ट्राला विकासाच्या प्रवासात मदत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनऊच्चार केला. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटच्या निमित्ताने मोदी आणि राजोएलिना यांची भेट झाली. द्वयींमधील ही पहिलीच भेट होती. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आणि प्राचीन भौगोलिक संबंधांना मान्यता दिली, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. त्यांनी द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा केली आणि संयुक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय मंचांवर दोन्ही देशांमधील घनिष्ठ सहकार्याचे कौतुक केले.
जागतिक परिषदेत मार्गदर्शन
दुबईतील जागतिक सरकार परिषदेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संबोधित केले. ‘माझा विश्वास आहे की आज जगाला अशा सरकारची गरज आहे जी सर्वांना सोबत घेऊन चालेल. दुबई ज्याप्रकारे जागतिक अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनत आहे, ती मोठी गोष्ट आहे,’ असे मोदी म्हणाले. आज आपण 21व्या शतकात आहोत. एकीकडे जग आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे, तर गेल्या शतकापासून सुरू असलेली आव्हानेही तितकीच व्यापक होत आहेत. अन्नसुरक्षा असो, आरोग्य सुरक्षा असो, जलसुरक्षा असो, ऊर्जा सुरक्षा असो वा शिक्षण असो. प्रत्येक सरकार आपल्या नागरिकांप्रती अनेक जबाबदाऱ्यांनी बांधलेले असते. आज प्रत्येक सरकारसमोर प्रश्न असा आहे की त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून पुढे जावे. माझा विश्वास आहे की आज जगाला अशा सरकारांची गरज आहे जी सर्वांना सोबत घेऊन चालेल, असेही त्यांनी नमूद केले.
आम्ही राज्यकारभारात जनभावनांना प्राधान्य दिले आहे. देशवासीयांच्या गरजांबाबत आम्ही संवेदनशील आहोत. लोकांच्या गरजा आणि लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यावर आम्ही भर दिला आहे. आज भारत सौर, पवन, पाणी तसेच जैवइंधन आणि ग्रीन हायड्रोजनवर काम करत आहे. आपली संस्कृती आपल्याला शिकवते की आपल्याला निसर्गाकडून जे मिळाले आहे ते परत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे भारताने जगाला एक नवा मार्ग सुचवला आहे, ज्याचे पालन करून आपण पर्यावरणाला खूप मदत करू शकतो, असेही ते पुढे म्हणाले.