ई-मोबिलिटीसाठी मजबूत चार्जिंग पायाभूत सुविधांवर भर
यासह अन्य विकासांवर सरकार लक्ष देणार : एच. डी. कुमारस्वामी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ई-मोबिलिटीच्या निरंतर वाढीस समर्थन देण्यासाठी अक्षय ऊर्जा स्त्राsतांचे एकत्रीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करून मजबूत चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विकासाला सरकार प्राधान्य देत आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली आहे. ते नवी दिल्लीतील 64 व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स परिषदेत बोलत होते.
आमचे मंत्रालय चार्जिंग पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे ई-मोबिलिटीच्या क्षेत्रात सतत वाढ होईल. आम्ही या पायाभूत सुविधांना अक्षय उर्जेसह एकत्रित करण्यास उत्सुक आहोत. इलेक्ट्रिक मोबिलिटीचे जास्तीत जास्त पर्यावरणीय फायदे मिळू शकतील, यादृष्टीने चार्जिंग सुविधा पुरवल्या जाणार आहेत. विकासाच्या मार्गावर पुढे जाताना भारताची शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उद्योगांनी कटिबद्ध प्रयत्न आणि सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
व्यवसायाचे वातावरण अधिक उद्योगस्नेही बनवण्यासाठी सरकार नवीन उपक्रम सुरू ठेवणार आहे. तसेच सरकार बहुप्रतिक्षित एफएएमई व टीआयएन योजनेअंतर्गत चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देत असल्याचेही कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे.