फेरबदलांपेक्षा किरकोळ बदलांतून सुधारणांवर भर
गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलचे उद्गार : वरिष्ठ खेळाडूंना साथ व सर्वोत्तम सल्ला देणे ही आमची जबाबदारी
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलचा मंत्र ज्याला मोडता येत नाही त्याला वाकविण्याच्या भागनडीत पडायचे नाही हा आहे. भारतीय क्रिकेट प्रणाली ज्या प्रकारे स्वत:च्या पद्धतीने चालते ते त्याला आवडते आणि त्या प्रणालीला लहानसहान मार्गांचा वापर करून अधिक चांगले होण्यासाठी मदत करणे हा आपल्या या नवीन जबाबदारीचा भाग असल्याचे त्याचे मत आहे.
सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत लखनौ सुपर जायंट्समध्ये काम केलेला मॉर्केल भारतात पुरेशा वेळा आलेला आहे आणि भारतीय क्रिकेट प्रणाली कशी कार्य करते हे जवळून पाहिलेले असल्याने तो त्या व्यवस्थेत कुठे बसेल हे त्याला चांगलेच माहीत आहे. मॉर्केलने सांगितले की, ही एक अशी संघरचना आहे जी स्वत:च्या पद्धतीने चालते आणि त्यामुळे त्याचे संरक्षण करणे आणि छोट्या मार्गांचा वापर करून ती अधिक चांगले बनवणे हे माझे ध्येय असेल, असे मॉर्केलने ‘बीसीसीआय टीव्ही’शी बोलताना सांगितले, आपले लक्ष फेरबदल करण्यापेक्षा किरकोळ बदलांवर असेल, असेही त्याने स्पष्ट केले.
रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहसारखे ‘सुपर सीनियर्स’ नेहमीच नेतृत्व करतील आणि आपले काम हे ‘सपोर्ट स्टाफ’चा एक भाग म्हणून त्यांना साथ देणे हे आहे, असे मॉर्केलचे मत आहे. आम्ही खूप नशीबवान आहोत की, असे दर्जेदार वरिष्ठ खेळाडू लाभलेले आहेत आणि ते जबाबदारी पेलून नेतृत्व करतील. त्यांना पाठिंबा देणे आणि त्यांना सर्वोत्तम सल्ला देणे ही आमची जबाबदारी आहे, असे मॉर्केल म्हणाला.
दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनसोबत खेळलेला मॉर्केल लवकरच 40 वर्षांचा होणार असून त्याच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून 544 आंतरराष्ट्रीय बळी आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकापूर्व शिबिरात सामील झालेल्या या दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडू सध्या खेळाडूंसोबत विश्वासपूर्ण नाते निर्माण करायचे आहे आणि तो त्यांना कशी मदत करू शकतो हे पाहण्यावर भर देण्याची त्याची इच्छा आहे. मी खेळाडूंची ताकद आणि त्यांचे कच्चे दुवे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना आगामी मालिकेसाठी ध्येय निश्चित करण्यास मदत करत आहे, असेही त्याने सांगितले.
चेन्नई कसोटी 3-4 दिवसात संपवण्याचा रोहित-गंभीरचा प्लॅन
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार असून यातील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. यासाठी टीम इंडियाने सरावदेखील सुरू केला आहे. शनिवारी कर्णधार रोहितसहृ विराट कोहली, आर अश्विन, रविंद्र जडेजा, बुमराहने जोरदार सराव केला. विशेष म्हणजे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उभय संघातील पहिला कसोटी सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाण्याची शक्यता आहे. बांगलादेशकडे दजेदार फिरकीपटू असल्याने त्यांची ताकद कमी करण्यासाठी हा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. बांगलादेशला काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळण्याची सवय आहे, लाल मातीचा वापर केल्यास सामना 3-4 दिवसात संपवण्याचा टीम इंडियाचा प्लॅन असेल.