हरित ऊर्जेवर भर , कच्च्या तेलाची वाढणार मागणी
2027 पर्यंत चीनला टाकणार मागे : इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचे भाकीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आजपासून अवघ्या 3 वर्षांनी भारत आणखी एका बाबतीत चीनला मागे टाकणार आहे. वर्ष 2027 मध्ये जागतिक कच्च्या तेलाच्या मागणीत वाढीचे केंद्र म्हणून भारत चीनला मागे टाकेल असे भाकीत इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने केले आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेत हरित ऊर्जेवर मोठा भर असला तरीही वाहतूक आणि उद्योगाचा वापर वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशातील कच्च्या तेलाची मागणी 2023 मध्ये 54.8 लाख बॅरल प्रतिदिन वरून 2030 मध्ये 66.4 लाख इतकी होईल, असे पॅरिस-आधारित एजन्सीने बुधवारी इंडिया एनर्जी वीकमध्ये प्रसिद्ध केलेल्या भारतीय तेल बाजाराच्या 2030 वरील विशेष अहवालात म्हटले आहे. चीन सध्या तेलाच्या मागणीचा सर्वात मोठा चालक आहे आणि भारत यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयईएने अहवालात दिलेला डेटा देशांतर्गत आणि निर्यातीसाठी कच्च्या तेलाचे इंधनात रूपांतर करण्याशी संबंधित आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत वापर सुमारे 50 लाख बॅरल प्रतिदिन आहे. आयईएचे संचालक (ऊर्जा बाजार आणि सुरक्षा) किसुके सदामोरी म्हणाले, जलद हरित ऊर्जेची पावले उचलली तरीही, भारताची तेलाची मागणी 2030 पर्यंत वेगाने वाढेल. भारताचा विकास दर 2027 मध्ये चीनला मागे टाकणार आहे.
भारतातील मागणी चीनच्या तुलनेत मागे राहील
विकसित देश आणि चीनमध्ये तेलाची मागणी मंदावल्याने भारत हा विकासाचा सर्वात मोठा स्रोत बनला आहे, असे आयईएमधील तेल उद्योग आणि बाजार विभागाचे प्रमुख टोरिल बोसोनी यांनी सांगितले. भारत हा सध्या अमेरिका आणि चीननंतर कच्च्या तेलाचा तिसरा मोठा ग्राहक आहे. ते आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करते आणि देशांतर्गत उत्पादनात घट झाल्याने हे अवलंबित्व वाढण्याची शक्यता आहे.