For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयडीतील प्रसूतीसह तातडीच्या शस्त्रक्रिया लांबणीवर

01:04 PM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयडीतील प्रसूतीसह तातडीच्या शस्त्रक्रिया लांबणीवर
Advertisement

गरोदर महिलांचे हाल; तारीख वाढल्यामुळे ताण : एसीची सुविधा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Advertisement

फोंडा : फोंडा येथील आयडी हॉस्पितळात एसी (चिलिंग) शितगृह युनिटात बिघाड झाल्याने प्रसूतीच्या प्रतीक्षेत असलेल्या गरोदर महिलांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्याचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर ‘रायझिंग फोंडाचे’ नेते डॉ. केतन भाटीकर यांनी संताप व्यक्त केला असून येत्या 25 जानेवारीपर्यंत एसीची सुविधा सुरळीत न झाल्यास फेंडा जुने बसस्थानक येथे रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आयडी इस्पितळातील अपुऱ्या वैद्यकीय सेवांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राप्त माहितीनुसार दोन दिवसांपासून आयडी इस्पितळात कार्यरत असलेल्या  शितगृहात बिघाड झाल्याने ऑपरेशन थिएटरमध्ये एसी बंद पडलेल्या आहेत. एकूण तीन शितगृहांपैकी केवळ एकच शितगृह पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमका त्यातच  बिघाड झाल्याने ऑपरेशनच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची धांदल उडाली आहे. यावर तोडगा काढणार कोण? वैद्यकीय सेवा सुरळीत करा, असा टाहो प्रसूतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मातेच्या कुटुंबीयांनी फोडला आहे.

Advertisement

वैद्यकीय अधीक्षकांनी जबाबदारी झटकली

आयडीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री मडकईकर यांनी सदर जबाबदारी आयडी इस्पितळाची नसून शितगृहाची डागडुजी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. उपलब्ध असलेल्या मर्यादित सुविधांमध्ये डॉक्टरांना काम करावे लागते. मुद्दामहून शस्त्रक्रिया लांबणीकर टाकण्यात येत नाही. आपत्कालीन असलेल्या शस्त्रक्रिया करण्यात येतात. अन्य शस्त्रक्रियांसाठी पुढील तारीख देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वारंवार एसी बिघाड होत असल्याने उच्चाधिकाऱ्याकडेही पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.

 सरकारी सोहळ्यांवर उधळपट्टी, वैद्यकीय सुविधेकडे दुर्लक्ष 

मागील कित्येक वर्षांपासून आयडी इस्पितळात वैद्यकीय सुविधा पुरविण्याची मागणी डॉ. भाटीकर करीत आहेत. रूग्णांसाठी अजूनही सीटी स्कॅन, रक्तपेढीची कमतरता जाणवत असून भाजपा सरकार केवळ जनतेच्या पैशावर सरकारी सोहळे करण्यात मग्न आहे. आज सरकारतर्फे ‘माझे घर’ योजनेचा उदोउदो करण्यात येतो, मात्र रूग्णांना मुलभूत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आरोग्य खाते सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप डॉ. भाटीकर यांनी केला आहे. याप्रश्नी नागरिकांची सह्याची मोहीम आखून थेट पंतप्रधान मोदीजींच्या कार्यालयात पत्रव्यवहार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दीर्घकाळापासून वचन दिलेल्या सुधारणांची वाट आयडी इस्पितळ पाहत आहे. तिसऱ्या जिल्ह्यातून फोंडा तालुका वगळल्याने उपजिल्हा इस्पितळ असलेल्या आयडी इस्पितळाचे अपग्रेडेशन होणेही सद्या मुष्किल झालेले आहे. आयडीच्या केज्युअल्टी विभागात दररोज 200 हून अधिक रूग्ण भेटी देत असतात त्यांना हाताळण्यासाठी केवळ दोन डॉक्टर पूर्णत: थकून जात असल्याचा दावा डॉ. भाटीकर यांनी केला. सीटी स्कॅन, न्यूरोलॉजिस्ट, अतिरिक्त रेडिओलॉजिस्ट आणि एक वरिष्ठ सर्जन डॉक्टराची नितांत गरज भासत आहे.

14 वर्षापूर्वी कार्यान्वित केलेले शितगृह युनिट 

फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे 14 वर्षापूर्वी नूतनीकरणा केले होते. त्यावेळी बसविण्यात आलेले शितगृह बऱ्यापैकी काम करत होते. त्यानंतर जीएसआयडीसी, बांधकाम खाते, आरोग्य खाते अशा विविध खात्याकडे या युनिटच्या डागडुजीची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे डागडुजीचा आवश्यक दर्जा कायम राखला गेला नाही. त्यामुळे एसी शितगृह युनिट बिघाड होण्यात मुख्य कारण असल्याचे तांत्रिक साहाय्यकाचे मत आहे. सद्या ब्लू स्टार या खासगी आस्थापनाद्वारे डागडुजीचे काम हाताळण्यात येणार आहे. दोन दिवस ओटीमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर ओपीडीमध्ये व्यस्त राहणार असल्यामुळे आज होणाऱ्या शस्त्रक्रियांनाही कधी तारीख मिळेल की बांबोळी येथील गोमेकॉची वाट धरावी लागेल, असा प्रश्न सरकारी इस्पितळावर अवलंबून असलेल्या गरीब रूग्णांना सतावत आहे.

Advertisement
Tags :

.