141 प्रवाशांसह विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
तामिळनाडूतील त्रिची विमानतळावर ‘आणीबाणी’ : सर्व यंत्रणांना केले सतर्क :
वृत्तसंस्था/ त्रिची
तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली (त्रिची) ते शारजाहला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे शुक्रवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या सुरक्षित लँडिंगमुळे विमानातील 141 प्रवासी आणि क्रू मेंबर्स बचावले आहेत. संध्याकाळी 5.40 वाजता विमानाने उड्डाण घेताच या विमानाची हायड्रोलिक यंत्रणा निकामी झाली. यानंतर विमान सुमारे अडीच तास आकाशात घिरट्या घालत राहिले. यानंतर रात्री 8.15 च्या सुमारास विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर सर्व प्रवाशांसह विमानतळ प्राधिकरणानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.
तामिळनाडूतील तिऊचिरापल्ली येथून उड्डाण केल्यानंतर विमानाचे हायड्रॉलिक निकामी झाले. हे विमान त्रिचीहून शारजाहला जात होते. वैमानिकाने विमानतळाला हायड्रोलिक फेल्युअरची माहिती दिल्यानंतर विमानतळ बेली लँडिंगसाठी सज्ज झाले. फ्लाइट निवासी भागातून जात असल्याने इंधन डंपिंगचा पर्याय निवडला गेला नाही. याआधी विमान हलके करण्यासाठी इंधन डंपिंगचा विचार केला जात होता. मात्र, विमान निवासी भागातून फिरत असल्याने हा पर्याय निवडला गेला नाही. विमानातील इंधन कमी करण्यासाठी पायलट आकाशात चक्कर मारत राहिला.
एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट क्रमांक एएक्सबी-613 मध्ये 141 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. बिघाड लक्षात येताच विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. वैमानिकाकडून आपत्कालीन संदेश मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि ऊग्णवाहिका विमानतळावर तैनात करण्यात आल्या. याशिवाय आपत्कालीन बचाव पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क ठेवण्यात आले होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलने लँडिंगची घोषणा करताच, विहित प्रक्रियेनुसार त्याचे लँडिंग करण्यात आल्यामुळे मोठा अपघात टळला. या घटनेबाबत बोलताना विमानतळ संचालकांनी काळजी करण्यासारखे काही नसून विमान सुरक्षितपणे उतरण्यास सक्षम असल्याचे सांगितले. तरीही खबरदारी म्हणून ऊग्णवाहिका आणि बचाव पथके स्टँडबायवर ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बेली लँडिंगचा पर्याय...
बेली लँडिंग ही आपत्कालीन लँडिंग प्रक्रिया असून त्यामध्ये विमान पूर्ण किंवा अंशत: अंडरपॅरेज (लँडिंग गियर) न उघडता उतरते. याला ‘गियर-अप लँडिंग’ असेही म्हणतात. या स्थितीत विमानाचे लँडिंग गियर पूर्णपणे कार्य करत नाही किंवा त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही. बेली लँडिंग म्हणजे विमान त्याच्या पोटाच्या (बेली) भागातून धावपट्टीवर उतरते. आणीबाणीच्या परिस्थितीत विमान उतरवण्यासाठी हा पर्याय वापरला जातो. त्याचे अनेक गंभीर परिणामही होऊ शकतात. विमान आणि धावपट्टीचे नुकसान होते. तसेच लँडिंगवेळी धक्का बसल्यामुळे प्रवासी आणि कर्मचारी जखमी होऊ शकतात. मात्र, बेली लँडिंग दरम्यान पायलटने अतिशय काळजीपूर्वक विमान नियंत्रित केल्यास सर्व धोके टळू शकतात.