‘अपाचे’ हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये मोठी दुर्घटना टळली
वृत्तसंस्था/ सहारनपूर (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिह्यात लष्कराच्या लढाऊ हेलिकॉप्टरचे शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सदर ‘अपाचे’ हेलिकॉप्टर सारसावा हवाई दल तळावरून नियमित सराव करण्यासाठी निघाले होते. याचदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच लँड केलेले हेलिकॉप्टर ‘अपाचे’ असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची चौकशी लष्करी पातळीवर सुरू आहे.
आपत्कालीन लँडिंगनंतर लष्कर आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. लष्कराची तांत्रिक टीम देखील हेलिकॉप्टरची चौकशी करत आहे. अपघातात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही आणि लँडिंग सुरक्षितपणे झाल्यामुळे येथे मोठी दुर्घटना टळली. स्थानिक लोकांनीही घटनास्थळी पोहोचून पथकाला मदत केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
गावातील शेतात हेलिकॉप्टर उतरताच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ तेथे जमले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये लोक हेलिकॉप्टरभोवती उभे असल्याचे दिसून येत आहे. ही बातमी मिळताच चिलकाणा पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकारी आणि अनेक लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. लष्कराने तात्काळ परिसर सुरक्षित केला. हवाई दलाची एक तांत्रिक टीमही घटनास्थळी पाठवण्यात आली असून त्यांच्याकडून हेलिकॉप्टरमधील बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.