लंकन संघात एम्बुल्डेनियाचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ कोलंबो
चालू महिन्याच्या अखेरीस लंकन क्रिकेट संघ द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी लंकन संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली असून लसिथ एम्बुल्डेनियाचे तब्बल दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन होत आहे.
लंकन क्रिकेट मंडळाने 17 जणांचा संघ जाहीर केला असून धनंजय डिसिल्वाकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये 9 फलंदाज, 3 फिरकी गोलंदाज तसेच 5 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. एम्बुल्डेनियाने यापूर्वी 17 कसोटी सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने आपली शेवटची कसोटी 2022 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. तो डावखुरी फिरकी गोलंदाज आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका लंकेने 2-0 अशी जिंकली होती. या मालिकेत प्रभास जयसुर्याने 18 गडी बाद केले होते. या दौऱ्यासाठी ओशादा फर्नांडोचे जवळपास एक वर्षानंतर संघात पुनरागमन होत आहे. मात्र फिरकी गोलंदाज रमेश मेंडीसला वगळण्यात आले आहे. उभय संघातील पहिली कसोटी 27 नोव्हेंबरपासून दरबानमध्ये तर दुसरी कसोटी 5 डिसेंबरपासून पोर्ट एलिझाबेथ येथे होणार आहे.
लंकन संघ: धनंजय डिसिल्वा (कर्णधार), पी. निशांका, डी. करुणारत्ने, दिनेश चंडीमल, अॅन्जेलो मॅथ्युज, कुसल मेंडीस, कमिंदु मेंडीस, ओशादा फर्नांडो, एस. समरविक्रमा, प्रभास जयसुर्या, निशान पेरीस, लसीथ एम्बुल्डेनिया, मिलन रत्नायके, असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो, एल. कुमारा आणि के. रजिता.