For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भ्रूण लिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश

11:45 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
भ्रूण लिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement

जिल्हा आरोग्य-बेंगळूरच्या पथकाकडून गोकाकात कारवाई

Advertisement

बेळगाव : गोकाक येथील इक्रा सर्जिकल अॅण्ड मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये भ्रूण लिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या  रॅकेटचा आरोग्य खात्याच्या बेंगळूर पथकाकडून पर्दाफाश सोमवार दि. 15 रोजी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी अधिकृत दुजोरा दिला. सदर हॉस्पिटलला टाळे ठोकण्यात आले असून हॉस्पिटलचे डॉ. कब्बूर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून चौकशी करण्यात येत असल्याचे डॉ. कोणी यांनी सांगितले. या रुग्णालयामध्ये भ्रूण लिंग निदान करून गर्भपात करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा आरोग्य खात्यासह बेंगळूर येथील पीसी अॅण्ड पीएनडीटी विभागाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन बेंगळूर येथून आलेल्या पीसी-पीएनडीटी विभागाच्या पथकाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या समवेत संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या कारवाईतून भ्रूण लिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

या कारवाईतून 70 ते 80 गर्भवती महिलांची तपासणी करून लिंग निदान करून भ्रूणहत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सदर हॉस्पिटलमध्ये 40 गर्भपात करण्यात आले आहेत. तर उर्वरित ममदापूर व मुडलगी येथील दोन रुग्णालयांमध्ये गर्भपात करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये तुकाराम भीमाप्पा खोत नामक एजंटाच्या माध्यमातून ही कृती करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. तुकाराम हा हॉस्पिटल व रुग्णांमध्ये एजंट म्हणून काम करत होता. याची चौकशी केल्यानंतर त्याने लिंग निदान करण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या रकमेची माहिती दिली आहे. इक्रा रुग्णालयात 40 गर्भपात तर उर्वरित मुडलगी येथील रुग्णालय व ममदापूर येथील रुग्णालयात प्रत्येकी 20 गर्भपात केले असल्याची माहिती पुढे आली आहे.

Advertisement

ममदापूर येथील डॉक्टरकडून 1 लाख 8 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. याचबरोबर संबंधित एजंटाने गुगल पे द्वारे डॉक्टरला 20 हजार रुपये पाठविल्याचे तपासात उघड झाले आहे. सोमवार दि. 15 रोजी 4 गर्भवती महिला लिंग निदानासाठी आल्या होत्या. ही बाबही कारवाई दरम्यान पथकाच्या निदर्शनास आली आहे. महिलांची चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांना सदर घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये भ्रूणहत्येचा प्रकार उघडकीस आला असून आरोग्य खातेही चक्रावून गेले आहे. याप्रकरणी गोकाक पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला असता सदर घटना घडली आहे. मात्र याबाबत पोलीस स्थानकात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :

.