नक्षीदार वाकळं आणि उबदार गोधडी
गोठणेवाडीची गोधडी मुंबईत : जुन्या हस्तकलेचे जतन
कोल्हापूरः सुधाकर काशीद
मऊशार चादरी, शाल, रंग अशा अंथरुणाच्या जमान्यात गोधडी किंवा टाके घालून हातावर तयार केलेली वाकळ म्हणजे गावठीपणा अशी आपणच आपली करून घेतलेली समजूत आहे. कारण काळाच्या ओघात पांघरूणात विविधता आली आहे. मऊशार रग जेवढा महाग तेवढा तो चांगला, असे मानले जात आहे. वाकळ, गोधडी हा जुना पांघरूणाचा प्रकार खरोखरच गुंडाळून ठेवला गेला आहे. वाकळ, गोधडी तयार करणाऱ्या भगिनी आणि ते कसे तयार करायचे, याची नव्या पिढीला माहिती नाही. मात्र अशा वातावरणात शाहूवाडी तालुक्यातील गोठणेवाडी येथील भगिनींनी गोधड्या, वाकळीचा धागा पुन्हा विणण्यास सुरुवात केली आहे. अगदी फार मोठी उलाढाल नाही. पण त्यांनी आठवड्यात 16 वाकळा तयार केल्या. त्यातल्या आठ मुंबईत पर्यटन महोत्सवात विकल्याही गेल्या.
या भगिनींना एका वाकळीतून 1200 ते 2500 रुपये मिळाले आहेत. पैशातील या मोलापेक्षा गोधडी किंवा वाकळेला पांघरूणात पुन्हा मायेच्या उबीचे स्थान मिळाले आहे. गोधडीच्या एकेका टाक्यातून मायेची शिवण पुन्हा घट्ट होऊ लागल्याचे विशेष समाधान या भगिनींना आहे. वाकळ तयार करताना यंत्राचा अजिबात स्पर्श नसतो. एकेक धागा किंवा टाका हातानेच घालावा लागतो. नजर आणि मन एकाग्र झाले तरच गोधडीला चांगला आकार येतो. गोधडी, वाकड, वाकळ आता शहरी भागात नाहीत. ग्रामीण भागात आजीने केलेल्या गोधड्या अनेक घरात आहेत. पण त्याही गुंडाळून ठेवल्या गेल्या आहेत. कारण मऊ रग, चादरी म्हणजेच पांघरूण, असे नव्या पिढीला समीकरण झाले आहे. परिणामी घराच्या अंगणात बसून दिवसा उजेडी गोधडी विणणाऱ्या भगिनींची संख्याही कमी झाली आहे. गोधडी किंवा वाकळ तयार करताना त्यात नवीन फार काही नसते. फक्त जाड दोऱ्याचा प्रत्येक टाका नवा असतो. बाकी जुनी साडी, रंगीबेरंगी कापडाचे त्रिकोणी-चौकोनी तुकडे यावरच गोधडी आकारास येते. मात्र त्यामागे भगिनीची कल्पकता आणि एकाग्रता मोलाची ठरत असते.
कोल्हापूर जिह्यातील गोठणेवाडीच्या भगिनींनी ही गोधडीची कला पुन्हा जिवंत करायचे ठरवले. पण त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी ‘आता तुमच्या जुन्या काळातल्या वाकडी, गोधड्या कोण विकत घेणार’ असाच नकारात्मक सुर त्यांच्याभोवती कायम फेर धरू लागला. त्यामुळे गोधडी शिवावी की नको, या प्रश्नाच्या गोंधळातच या भगिनी अडकून गेल्या. पण कोल्हापूर पर्यटन संस्थेचे कृष्णराव माळी यांनी या भगिनींना मानसिक बळ दिले. गोठणेवाडीच्या या साऱ्या भगिनी प्रकल्पग्रस्त आहेत. आपले वाड्या-वस्तीवरचे मूळ गाव सोडून त्या शाहूवाडी तालुक्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे आजी, पणजी आई, मावशी, काकू यांच्याकडून परंपरेने चालत आलेली वाकळ, गोधडी बनवण्याची कला आहे. पण या बदलत्या काळात त्यांना वावच मिळत नव्हता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुन्हा गोधडी बनवण्यासाठी पहिला टाका घातला आणि अठरा वाकळ, गोधड्या तयार झाल्या. मुंबईत महालक्ष्मी सरस या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या पर्यटन महोत्सवात गेल्या. एकाला एक धागा जोडत तयार झालेल्या या गोधड्या तेथे कौतुकाचा विषय ठरल्या. आता गोठणेवाडीच्या भगिनी नियज्मत वाकळा विणणार आहेत आणि वाकळ, गोधडीच्या माध्यमातून पुन्हा एक हरवत चाललेली ग्रामीण हस्तकला जिवंत करणार आहेत.
या भगिनींच्या धाग्यात आपणही आपला मदतीचा एखादा धागा गुंफू शकतो. अनेक घरात जुन्या साड्या कपाटात पडून असतात. साड्या एवढ्या की, त्या वापरता येत नाहीत आणि टाकायचे धाडस होत नाही. त्यापैकी चार-पाच साड्या या भगिनींना आपण मोफत दिल्या तर आपल्या घरात या पडून राहिलेल्या साड्यातून गोधड्या आकाराला येणार आहेत. थंडीत त्या उब तर देणार आहेतच. पण या भगिनींना बळही देणार आहे.