भारत फायनान्शियल कंपनीत 29 लाख 73 हजारांचा अपहार
कोल्हापूर :
भारत फायनान्शियल कंपनीच्या तिघा फिल्ड असिस्टंटनी कंपनीच्या कर्जदारांकडून वसूल केलेल्या कर्जाच्या हप्ताची सुमारे 29 लाख 73 हजार रुपयाच्या रक्कमेचा अपहार केला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनायक महादेव घोटणे (रा. तारदाळ, ता. हातकणंगले), अमोल संजय जगताप (रा. पंढरपूर) व पवन शिवाजी पवार (रा. नांदणी, ता. शिरोळ) या तिघाविरोदी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या तिघापैकी विनायक घोटणे याला अटक केली असून, अमोल जगताप आणि पवन पवार या दोघांचा शोध सुरु केला आहे. याबाबत कंपनीचे व्यवस्थापक आशूतोष अनंतकुमार साळूंखे (वय 27, रा. सांगली) यांनी फिर्याद दाखल केली.
शहरातील साने गुरुजी वसाहत येथे भारत फायनान्शियल या कंपनीचे कार्यालय आहे. त्याच्याकडे संशयित अमोल जगताप, विनायक घोटणे आणि पवन पवार हे तिघे वसुली कर्मचारी म्हणून नोकरी करीत होते. जगताप याने ऑक्टोबर 2021 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत कर्जदारांकडून 6 लाख 72 हजार 840 रुपये वसुल केले. तर विनायक घोटणे याने 65 कर्जदारांकडून हप्त्यासाठीची 18 लाख 77 हजार 334 रुपयांची वसुली डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 कालावधीत पूर्ण केली होती. पवार याने 21 कर्जदारांकडून 4 लाख 23 हजार 731 रूपये आणले होते. मात्र, या तिघा संशयितांनी ही रक्कम कंपनीत भरली नाही. ही बाब कंपनीच्या लेखापरिक्षणात समोर आली. त्यामुळे या तिघा संशयितांनी कंपनीच्या 29 लाख 73 हजार रुपये रक्कमेचा अफरातफर केल्याची फिर्याद कंपनीचे व्यवस्थापक साळूंखे यांनी जुना पोलीस ठाण्यात दाखल केली.