Panhala Fort: तटबंदी पुन्हा एकदा ढासळली, आकाशवाणी टॉवर परिसरातील घटना
वातावरण स्पष्ट झाल्यावर पायथ्याशी असणाऱ्या गावकऱ्यांना घटना नजरेस आली
पन्हाळा : पन्हाळा सततच्या सुरु असलेल्या पावसाने पन्हाळगडाच्या आकाशवाणी टाँवर परिसरातील दक्षिण भागाच्या तटबंदीचा काही भाग ढासळला. यामुळे यावर्षी देखील तटबंदीच्या पडझडीची मालिका सुरुच राहिली आहे. मागील काही वर्षापासुन पन्हाळ्याच्या तटबंदीचे बांधकाम कमकुवत होऊन ही तटबंदी जागोजागी ढासळू लागल्याचे समोर येत आहे.
मंगळवारी सकाळी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या निकमवाडी, गुडे ग्रामस्थांना ही तटबंदी ढासळ्याचे दिसुन आले. दरीच्या बाजूने माती सरकुन येथील शिळांनी जमिनीचा वेध घेतला. मंगळवारी सकाळच्या वेळी काही धुके जाऊन वातावरण स्पष्ट झाल्यावर पायथ्याशी असणाऱ्या गावकऱ्यांना ही घटना नजरेस आली.
पाऊस आणि घनदाट धुक्यामुळे सध्या तरी या घटनेची जाणीव होत नसली तरी उघडीपी नंतरच याची नेमकी परिस्थीती दिसून येणार आहे.तरी सुरु असलेल्या पावसाने आणि झालेल्या घटनेने गडाच्या भोवती पायथ्याशी असणाऱ्या गावांना ही धोक्याची घंटा आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
पन्हाळगडाची नोंद जागतिक वारसा स्थळात झाली ही अभिमनाची गोष्ट आहे. पण मागील कित्येक वर्षापासून गडावर पडझडीची मालिका सुरु आहे. आता देश-विदेशातील पर्यटक पन्हाळ्यात येतील.मग त्यांना पन्हाळ्याचे हे ढासळते वैभव दाखवायचे का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.