For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलन मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर

06:20 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
एलन मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर
Advertisement

नेमके कारण अस्पष्ट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्पेसएक्स आणि टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आता ते चालू वर्षाच्या अखेरीस भारतात येणार आहेत. पूर्वनियोजनानुसार 21 आणि 22 एप्रिलला मस्क भारतात येणार होते. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत देशातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार होते. याशिवाय मस्क आणि त्यांचे सहकारी-शिष्टमंडळ सरकारी अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधींनाही भेटणार होते. मात्र, त्यांनी आपल्या दौऱ्यात बदल केल्यामुळे या सर्व बैठका लांबणीवर पडल्या आहेत. त्यांचा दौरा अचानक रद्द होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

10 एप्रिल रोजी मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत आपण लवकरच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ते 21 आणि 22 एप्रिल रोजी भारतात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर 23 एप्रिल रोजी टेस्लाच्या पहिल्या तिमाहीतील कामगिरीशी संबंधित एका बैठकीच्या निमित्ताने मस्क अमेरिकेतील एका कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी होणार होते. मात्र, आता त्यांचा भारत दौरा रद्द झाला आहे.

मस्क यंदा प्रथमच भारत दौऱ्यावर येणार होते. यावेळी मस्क भारतात टेस्लाच्या उत्पादन प्रकल्पाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत होती. तसेच मस्क भारतात 2-3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर करतील. टेस्ला केवळ भारतासाठीच कार तयार करू इच्छित नाही, तर येथून जागतिक बाजारपेठेत निर्यातही करू इच्छितो. याशिवाय मस्क लवकरच भारतात उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवाही सुरू करू शकतील, असे तर्कही व्यक्त केले जात होते.

Advertisement
Tags :

.