For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इलॉन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात मान्यता

06:19 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
इलॉन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात मान्यता
Advertisement

आता देशात सॅटेलाईटद्वारे इंटरनेट चालणार : 15 दिवसांत चाचणी सुरू होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इलॉन मस्कची कंपनी ‘स्टारलिंक’ला आता भारतात ‘स्टारलिंक’द्वारे इंटरनेट सेवा (सॅटकॉम सेवा) प्रदान करण्याची परवानगी मिळाली आहे. ‘स्टारलिंक’ला भारताच्या दूरसंचार विभागाकडून (डीओटी) ही मान्यता मिळाली आहे. या मंजुरीमुळे भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करण्यास मदत होऊ शकते. ‘स्टारलिंक’ आता हा परवाना मिळवणारी भारतातील तिसरी कंपनी बनली आहे. येत्या 15-20 दिवसांत त्यांना त्याची चाचणी घेण्यासाठी स्पेक्ट्रम देखील मिळेल. यामुळे भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणखी मजबूत होतील.

Advertisement

भारतीय दूरसंचार विभागाने ‘स्टारलिंक’ला ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाईट (जीएमपीसीएस) परवाना दिला आहे. या परवान्यामुळे स्टारलिंक भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करू शकेल. भारती एअरटेल-युटेलसॅटच्या वनवेब आणि रिलायन्स जिओ नंतर स्टारलिंक ही परवाना मिळवणारी तिसरी कंपनी आहे. आता लवकरच स्पेक्ट्रम वाटप केले जाईल. यानंतर, मोठ्या प्रमाणात सेवा सुरू झाल्यानंतर भारतातील ग्राहकांची संख्या वाढेल, असे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले.

इंटरनेट सेवा दुर्गम भागात पोहोचेल

स्टारलिंक हा स्पेसएक्सचा नवीन प्रयत्न आहे. ते उपग्रहाद्वारे इंटरनेट प्रदान करण्याचे काम करते. लोकांना चांगली इंटरनेट सुविधा देणे हे त्याचे ध्येय आहे. हे अनेक उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत (एलईओ) ठेवून केले जाते. हे उपग्रह सामान्य उपग्रहांपेक्षा पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे इंटरनेटचा वेग जलद असेल.  सध्या इंटरनेट सुविधा उपलब्ध नसलेल्या देशाच्या दुर्गम भागातील लोकांसाठी हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे.

किती वेग, किती खर्च येईल?

स्टारलिंकच्या माध्यमातून ग्राहकांना साधारणपणे 25 ते 220 एमबीपीएसपर्यंत डाउनलोड गती मिळेल. बहुतेक लोकांना 100 एमबीपीएस पेक्षा जास्त स्पीड मिळतो. ही सेवा सुरू झाल्यानंतर स्टारलिंक भारतात एका खास ऑफरसह सुरुवात करणार आहे. यामध्ये, अमर्यादित डेटा प्लान दरमहा 10 डॉलर्सपेक्षा कमी किमतीत (सुमारे 857 रुपये) उपलब्ध असेल. या सुरुवातीच्या किमतीमुळे स्पेसएक्सला बाजारात लवकर स्थान मिळण्यास मदत होईल.

सॅटेलाईट कम्युनिकेशन क्षेत्राला गती

जीएमपीसीएस परवाना मिळाल्यानंतर भारताचे सॅटेलाईट कम्युनिकेशन क्षेत्र वेगाने वाढेल. यासह, लो-अर्थ ऑर्बिट सॅटेलाईटद्वारे देशभरात इंटरनेट पोहोचवले जाईल. यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. स्टारलिंक 2021 पासून भारतीय बाजारात येऊ इच्छित होते. परंतु, काही नियमांमुळे कंपनीला त्यांचे प्रयत्न थांबवावे लागले. तसेच, प्री-ऑर्डरचे पैसे परत करावे लागले. आता पुन्हा एकदा कंपनी भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. अॅमेझोनचा प्रोजेक्ट कुइपर देखील परवाना मिळविण्याच्या प्रतिक्षेत आहे.

Advertisement
Tags :

.