एलन मस्क यांच्या स्पेसएक्सने रचला इतिहास
पहिल्यांदाच खासगी ‘क्रू’ला पाठविले अंतराळात
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेतील उद्योजक एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने पोलारिस डॉन मिशन प्रक्षेपित केली आहे. परंतु हवामानामुळे प्रक्षेपणात सुमारे दोन तासांचा विलंब झाला. ही मोहीम पाच दिवसांची आहे. एका अब्जाधीश उद्योजकासमवेत 4 अंतराळवीरांनी मंगळवारी अंतराळाच्या दिशेने झेप घेतली आहे.
या मोहिमेचा उद्देश नव्या स्पेससूट डिझाइन्सचे परीक्षण करणे आहे. ही जगातील पहिली खासगी स्पेसवॉक असणार आहे. सर्व अंतराळवीरांनी स्पेसएक्सच्या क्रू डॅगन कॅप्सूलमधून उ•ाण केले आहे. याच कॅप्सूलच्या माध्यमातून नासा सुनीता विलियम्स यांना अंतराळ स्थानकावरून परत आणण्याच्या योजनेवर काम करत आहे.
अंतराळयानाच्या चालक दलात एक अब्जाधीश उद्योजक, एक सेवानिवृत्त लढाऊ वैमानिक आणि स्पेसएक्सचे दोन कर्मचारी सामील आहेत. कॅप्सूलमध्ये अब्जाधीश जेरेड इसाकमॅन, मिशन पायलट स्कॉट पोटेट, स्पेसएक्स कर्मचारी सारी गिलिस आणि अन्ना मेनन यांनी उड्डाण केले आहे. स्कॉट पोटेट हे अमेरिकेच्या वायुदलाचे सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत.
गिलिस आणि अन्ना मेनन स्पेसएक्समध्ये वरिष्ठ इंजिनियर आहेत. इसाकमॅन आणि गिलिस अंतराळयानातून बाहेर पडतील आणि स्पेसवॉक करणार आहेत. तर पोटेट आणि मेनन केबिनमध्ये राहणार आहेत. चारही अंतराळवीर तेथे वैज्ञानिक परीक्षणही करणार आहेत. ब्रह्मांडिय विकिरण आणि अंतराळाचा मानवी शरीरावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पाचवी जोखीमयुक्त मोहीम
ही क्रू ड्रॅगनची आतापर्यंतची पाचवी आणि सर्वात जोखिमयुक्त खासगी मोहीम आहे. प्रक्षेपणाच्या काही मिनिटांनी अंतराळात पोहाचल्यावर यान एका अंडाकृती आकाराच्या कक्षेत स्थापित होईल. 1972 मध्ये अमेरिकेच्या अपोलो मून कार्यक्रमानंतर मानवाकडून गाठण्यात आलेले हे अंतराळाचे सर्वाधिक अंतर असेल. ही मोहीम मागील महिन्यात प्रक्षेपित करण्याची योजना होती. परंतु हेलियम गळतीमुळे प्रक्षेपण टाळावे लागले होते.
पूर्वी सरकारी संस्थेद्वारे अंतराळमोहीम
या मोहिमेपूर्वी केवळ उच्च प्रशिक्षित आणि सरकारी अंतराळवीरांनीच स्पेसवॉक केला होता. 2000 साली निर्मितीपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सुमारे 270 आणि चीनच्या तियांगोंग अंतराळ स्थानकावर चिनी अंतराळवीरांनी 16 स्पेसवॉक केले आहेत. पोलारिस डॉन स्पेसवॉक मिशनच्या तिसऱ्या दिवशी यान 700 किलोमीटरच्या उंचीवर पोहोचेल आणि सुमारे 20 मिनिटांपर्यंत तेथे स्पेसवॉक होणार आहे. पहिला अमेरिकन स्पेसवॉक 1965 मध्ये जेमिनी कॅप्सूलमध्ये करण्यात आला होता.