इलॉन मस्क यांचे वडील अयोध्याचरणी लीन
सोबत कन्येसह सहकारी उपस्थित : रामलल्लांसह हनुमानगढीचे दर्शन
वृत्तसंस्था/अयोध्या
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांचे वडील इरोल मस्क बुधवारी अयोध्येत पोहोचले. त्यांच्यासोबत मुलगी अलेक्झांड्रा मस्क, प्रेरक वक्ते विवेक बिंद्रा आणि इतर 16 लोक होते. खासगी जेटने ते दिल्लीहून अयोध्या विमानतळावर पोहोचले. याप्रसंगी त्यांनी कुर्ता आणि पायजमा असा भारतीय पेहराव परिधान केला होता. इलॉन मस्क यांनी राममंदिरात जात रामलल्लाचे दर्शन घेतले. ते सुमारे 40 मिनिटे मंदिर परिसरात होते. त्यांनी मंदिर ट्रस्टच्या लोकांकडून मंदिराच्या बांधकामाचीही माहिती घेतली. ट्रस्टच्या लोकांनी इरोल मस्क यांचे स्वागत करत त्यांना राममंदिराचा प्रसाद दिला. राममंदिराला भेट दिल्यानंतर मस्क यांनी हनुमानगढीला भेट दिली.
इरोल मस्क यांची ही भेट व्यवसाय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणार आहे. ते सुमारे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून 6 जूनला आफ्रिकेला रवाना होतील. भारत हे एक अद्भुत ठिकाण आहे. शक्य तितक्या जास्त लोकांनी भारतात यावे. मी अमेरिकेतील भारतीयांच्या संपर्कात असल्यामुळे मला भारतीय संस्कृती माहित आहे. येथील लोक प्रेम आणि दयाळूपणाने भरलेले आहेत, असे इरोल मस्क यांनी अयोध्या विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.