इलॉन मस्क यांनी केले भारताचे कौतुक
भारताच्या विकासासंबंधी सरकार-विरोधक मतभेद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची अर्थव्यवस्था आता जोमाने वाढत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे योगदानही गेल्या 10 वर्षांमध्ये लक्षणीयरित्या वाढले आहे. अमेरिकेचे जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी या भारताच्या या प्रगतीचे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा संदर्भ देऊन कौतुक केले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी युवकांच्या एका कार्यक्रमात दिली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन येथे सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी करण्यात आले होते. सीतारामन यांनी या कार्यक्रमात बोलताना विरोधकांच्या नकारात्मक दृष्टीकोनावरही टीका केली.
जगाच्या अर्थव्यवस्थेत चीनचे योगदान आज 26 टक्के इतके आहे. तर भारताचे योगदान 17 टक्क्यांचे आहे. या दोन देशांचे मिळून योगदान जवळपास 44 टक्क्यांचे आहे. या दोन्ही देशांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण आर्थिक प्रगतीचे हे द्योतक आहे, असे इलॉन मस्क यांनी नुकतेच स्पष्ट केले होते.
हे माहितीच असेल युवकांना
आजचा युवक आणि विद्यार्थी इंटरनेटचा भोक्ता आहे. त्याला इलॉन मस्क यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेसंबंधी कोणती विधाने केली आहेत, याची माहिती निश्चितच असेल. तथापि, भारतातील विरोधी पक्ष मात्र अद्यापही नकारात्मक मानसिकतेतच आहेत. भारताने गेल्या दशकात मोठी आर्थिक प्रगती साध्य केली आहे, हे विरोधकांनी मोकळेपणाने मान्य केले पाहिजे. सत्य नाकारण्याचा प्रयत्न त्यांनी करु नये. तो यशस्वी होणार नाही, अशा अर्थाची टीका त्यांनी या कार्यक्रमात केली.
रिजीजू यांच्याकडूनही टोला
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनीही इलॉन मस्क यांच्या विधानाचा उल्लेख विरोधकांना टोला हाणताना केला आहे. विरोधकांनी सरकारवर टीका आवश्य करावी. त्यांचा तो अधिकार आहे. मात्र, सरकारवर टीका करण्याच्या नादात त्यांनी भारताचा अवमान होईल अशी विधाने करु नयेत. भारताचे महत्व आज जगातील इतर देशांमधील मान्यवर ओळखतात आणि ते तशी विधानेही करतात. विरोधकांनी ही बाबही विचारात घ्यावी. भारतासंबंधी नकारात्मकता प्रदर्शित केल्याने विरोधकांचे भविष्य सुधारणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन किरण रिजीजू यांनी केले आहे.
आर्थिक पाया भक्कम
भारताचा आर्थिक पाया भक्कम करण्याचे काम सध्याच्या केंद्र सरकारने केले आहे. आता या पायावर भारताची अर्थव्यवस्था जगात अधिकाधिक उंच होत जाणार आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भारताच्या सरकारने अर्थव्यवस्थेसंबंधात जे पायाभूत काम केले, त्याची फळे येत्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्यांच्या पदरी पडण्यास प्रारंभ होणार आहे. जागतिक वित्तीय संस्था, अर्थक्षेत्रातील मान्यवर आणि इतर देशांची प्रशासने यांनाही आता भारताचे महत्व कळावयास प्रारंभ झाला असून पुढचा काळ भारताच्या उत्कर्षाचा आहे, याची जाणीव जगाला झाली आहे. विरोधकांनी हे लक्षात घ्यावे, अशी मांडणी किरण रिजीजू यांनी यावेळी केली.