एलोन मस्क बनले 14 व्या मुलाचे बाप
जोडीदार शिवोन गिलिसने केली चौथ्या मुलाच्या जन्माची घोषणा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क 14 व्यांदा वडील झाले आहेत. मस्कच्या कंपनी न्यूरालिंकशी संबंधित शिवोन गिलिस हिने मस्कसोबतच्या आपल्या चौथ्या मुलाच्या जन्माची घोषणा शनिवारी केली. शिवोन गिलिस हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अपत्याची माहिती दिली. या पोस्टवर मस्क यांनीही हार्ट इमोजी बनवून प्रतिसाद दिला आहे.
शिवोन गिलिसने 2021 मध्ये आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे मस्कसोबत स्ट्रायडर आणि अझ्युरला जन्म दिला. तसेच 2024 मध्ये त्यांचे तिसरे मूल आर्केडिया याचा जन्म झाला. मस्क यांनी आर्केडियाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी माहिती दिली होती. शिवोन गिलिस ही मस्कच्या न्यूरालिंक या कंपनीमध्ये एआय तज्ञ या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. मस्क यांना त्यांची पहिली पत्नी कॅनेडियन वंशाची लेखिका जस्टिन विल्सन हिच्यापासून पाच मुले असून ग्रिफिन आणि विवियन या जुळ्यांसह काई, सॅक्सन आणि डॅमियन या अन्य तिघांचा समावेश आहे.