मुंबई इंडियन्स-गुजरात जायंट्समध्ये आज ‘एलिमिनेटर’
वृत्तसंस्था/ मुंबई
महिला प्रीमियर लीगमधील एलिमिनेटर आज गुरुवारी मुंबईत होणार असून त्यात माजी विजेता मुंबई इंडियन्स गुजरात जायंट्सचा सामना करेल. या मोसमात दोनदा त्यांनी गुजरात जायंट्स संघाला पराभूत केलेले असून कठीण परिस्थितीत मुंबई इंडियन्सला योग्य वाट दाखविण्याची हरमनप्रीत कौरची क्षमता याही वेळी महत्त्वाचा घटक ठरेल.
गुणतक्त्यावर 10 गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आधीच अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे आता भारताची कर्णधार हरमनप्रीत आणि गुजरात जायंट्सची कर्णधार अॅश्ले गार्डनर यांच्यावर लक्ष केंद्रीत झाले असून त्यांना आपापल्या संघाला अंतिम फेरीत पोहेचविण्याच्या दृष्टीने जोर लावावा लागेल. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार असल्याने आणि सोमवारी झालेल्या साखळी सामन्यात गुजरात जायंट्सचा पराभव केलेला असल्यामुळे मुंबई इंडियन्सला नक्कीच अनुकूलता राहील.
मुंबई इंडियन्सच्या संघरचनेत फारसा बदल झालेला नसून हेली मॅथ्यूजने त्यांना चांगली सुऊवात करून दिली आहे आणि तिच्या ऑफस्पिनने प्रतिस्पर्ध्यांना त्रास दिलेला आहे. गुजरातविऊद्धच्या मागील दोन लढतींत तिने उत्कृष्ट कामगिरी केलेली असल्याने वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूवर त्याची पुनरावृत्ती घडविण्याचा भार राहील. नॅट सायव्हर-ब्रंटने मुंबईतर्फे सर्वाधिक धावा केल्या असून तिने चार अर्धशतके झळकावली आहेत आणि आठ सामन्यांतून 416 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूला रोखण्याची जबाबदारी गुजरात जायंट्सच्या गोलंदाजांवर असेल.
या मोसमात हरमनप्रीतचा फॉर्म खराब राहिलेला असला, तरी तिने सोमवारी गुजरातविऊद्ध अर्धशतक झळकावलेले असल्याने तिला पुरेसा आत्मविश्वास मिळाला असेल. गुजरात जायंट्सची कर्णधार गार्डनरचा फॉर्म या हंगामात हेलकावे खात राहिलेला असला, तरी ती 235 धावांसह आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये कायम राहिली आहे. गुजरात प्रतिभावान फलंदाज हरलीन देओलवर बराच अवलंबून असून सलामीवीर बेथ मुनी चांगली सुऊवात करून देईल, अशीही आशा त्यांना असेल.