जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा
सोपोरच्या रामपूर जंगलात चकमक
वृत्तसंस्था/ बारामुल्ला
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील सोपोरमध्ये शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. याआधी 8 नोव्हेंबरला सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दोन दिवसांपासून सुरक्षा दलाकडून सोपोरमध्ये शोधमोहीम सुरू होती. शनिवारी रामपूरच्या जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांची संयुक्त शोधमोहीम सुरू केली. याचदरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. रात्री उशिरापर्यंत या भागात चकमक व शोधमोहीम सुरू होती.
सोपोरमध्ये शुक्रवारीही सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दाऊगोळा आणि पाकिस्तानी कागदपत्रे व चलन जप्त करण्यात आली आहेत. लष्कराने सागीपोरा आणि पानीपोरामध्ये शोधमोहीम राबवताना ही कारवाई केली. या भागात 7 नोव्हेंबरच्या रात्रीपासून चकमक सुरू होती. त्यापूर्वी 3 नोव्हेंबरला श्रीनगरच्या टुरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळ रविवारच्या बाजारात ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात 12 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन स्थानिक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.