शरीरसुखासाठी पिडत असल्याने काढला काटा
बळ्ळीगेरीतील युवकाच्या खून प्रकरणी महिलेसह दोघे अटकेत
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
बळ्ळीगेरी, ता. अथणी येथील एका युवकाच्या खून प्रकरणी महिलेसह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. अथणी पोलिसांनी ही कारवाई केली असून जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
श्रीदेवी हिंदुसिंग रजपूत (वय 32) राहणार बळ्ळीगेरी, ता. अथणी, तिचा बालपणीचा मित्र भैरू श्रीमंत पवार (वय 37) राहणार रोणीहाळ, ता. बसवन बागेवाडी, जि. विजापूर अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर, उपनिरीक्षक गिरीमल्लाप्पा उप्पार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
मंगळवार दि. 22 सप्टेंबर रोजी दुपारी अथणी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रणवीर दत्तासिंग रजपूत (वय 32) मूळचा राहणार संभाजीनगर, नांदणी रोड, जयसिंगपूर, सध्या राहणार बळ्ळीगेरी, ता. अथणी या युवकाचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी महिलेसह दोघा जणांना अटक केली आहे.
खून झालेल्या रणवीरच्या आईचे डोळ्याचे ऑपरेशन होते. त्यामुळे त्याचा भाऊ आईसोबत मिरजेला गेला होता. घरात आजी लक्ष्मीबाईसोबत रणवीरला ठेवले होते. हीच संधी साधून रणवीरचा काटा काढण्यात आला. सुरुवातीला पूर्ववैमनस्य असलेल्या चौघा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी श्रीदेवीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता आपला बालमित्र भैरूच्या मदतीने रणवीरचा काटा काढल्याची कबुली तिने दिली.
खून झालेला रणवीर लैंगिक उद्देशासाठी आपल्याला पिडत होता. ही गोष्ट बालमित्र भैरू पवारला आपण कळविली. पंधरा दिवसांपूर्वीच त्याला बळ्ळीगेरीला बोलाविण्यात आले. रणवीरचे घरही दाखविण्यात आले. 21 सप्टेंबर रोजी रणवीरची आई व भाऊ ऑपरेशनसाठी मिरजेला गेल्याची माहिती श्रीदेवीने भैरूला दिली. घरात रणवीर एकटाच आहे, हे समजताच मोटारसायकलवरून 21 सप्टेंबर रोजी रात्री भैरू बळ्ळीगेरीत आला.
आपली मोटारसायकल सुरू होत नाही, असे सांगत रणवीरला घराबाहेर बोलाविण्यात आले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून करण्यात आला. आपण रणवीरचा काटा काढल्याचे मैत्रिणीला सांगून भैरू तेथून पसार झाला होता. पोलिसांनी खुनाच्या घटनेनंतर काही दिवसांतच श्रीदेवी व भैरूच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तपास पथकात बी. आर. पाटील, जमीर पट्टेगार, जी. पी. राठोड, बी. एम. तळवार, ए. ए. मयुर, तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नावर आदींचा समावेश आहे.