For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवाद्यांचा पूर्ण नि:पात करा !

07:10 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
दहशतवाद्यांचा पूर्ण नि पात करा
Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्याकडून सुरक्षा दलांना संपूर्ण स्वातंत्र्य, काश्मीरमधील स्थितीचा घेतला आढावा

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

हिंसाचार माजविणाऱ्या दहशतवाद्यांचा पूर्ण नि:पात करण्यासाठी सुरक्षा दलांनी आपली संपूर्ण शक्ती उपयोगात आणावी, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. यासाठी सुरक्षा दलांना संपूर्ण मुक्तहस्त देण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तीन दिवस सलग जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांकडून हल्ले होत आहेत. एक हल्ला प्रवासी बसवरही करण्यात आला होता. त्यात 9 प्रवासी मृत झाले होते. जूनच्या अखेरीपासून अमरनाथ यात्रेचा प्रारंभ होत आहे. ही यात्रा 19 ऑगस्टपर्यंत चालणार असून त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या सर्व काळात दहशतवादी हल्ल्यांची संख्या आणि तीव्रता वाढण्याची शक्यता गृहित धरुन सुरक्षा व्यवस्था बळकट केली जात आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांना केंद्र सरकारकडून सर्व स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

परिस्थितीचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी केंद्र सरकारच्या आणि जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थिती समजून घेतली. लोकसभा निवडणुकीची मतगणना झाल्यानंतर या भागातील दहशतवादी कारवायांमध्ये अचानक वाढ झाली आहे. सुरक्षा दलांनी आपले दहशतवादाविरोधातील संपूर्ण स्वातंत्र्य उपयोगात आणावे. केंद्र सरकार  सुरक्षा दलांची पाठराखण करेल, असा विश्वास त्यांनी दिला आहे.

डोवाल यांचीही उपस्थिती

या उच्चस्तरीय आढावा बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. तसेच दहशतवादाविरोधात कोणती कारवाई केली जात आहे, याचीही माहिती दिली.

दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध

चार दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. त्यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या राईसी येथील हल्ल्याच्या सूत्रधाराचेही रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध चालविला आहे.

संशयित दहशतवादी ठार

कथुआ येथे एका संशयित दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. मध्यरात्री झालेल्या गोळीबारात तो ठार झाला. या चकमकीत केंद्रीय राखीव दलाचा एक सैनिकही हुतात्मा झाला. दोडा भागातील कोटा आणि भन्साळा येथेही सुरक्षा सैनिक आणि दहशतवादी यांच्यात गोळीबार झाल्याची माहिती देण्यात आली.

दहशतवाद्यांना स्थानिकांचे साहाय्य

पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांना काश्मीरमधील काही स्थानिकांचे सहकार्य मिळत आहे. दहशतवाद्यांना सहाय्य करण्यासाठी काही स्थानिक दहशतवाद्यांनी नेटवर्क बनविले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांकडून केला जात आहे. यासाठी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली जात आहे. जम्मूच्या सीमावर्ती भागात सीमेच्या नजीक पाकव्याप्त काश्मीरात दहशतवाद्यांनी नव्या लपण्याचा जागा निर्माण केल्याचेही वृत्त आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Advertisement
Tags :

.