For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालकामगार पद्धतीचे उच्चाटन करा

11:04 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बालकामगार पद्धतीचे उच्चाटन करा
Advertisement

न्यायाधीश पी. मुरलीमोहन रेड्डी यांचे आवाहन : कुमार गंधर्व रंगमंदिरात जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे आचरण 

Advertisement

बेळगाव : बालकामगार पद्धत निर्मूलनासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. कारण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हॉटेल, दुकाने यांची नित्यनेमाने पाहणी करून तेथे बालकामगार असतील तर त्यांचे रक्षण करायला हवे. यासाठी सर्वांनी परस्परांना सहकार्य करणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे कार्यवाह व न्यायाधीश पी. मुरलीमोहन रेड्डी यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, महिला व बालकल्याण विभाग, कामगार खाते तसेच बेळगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जागतिक बालकामगार विरोधी दिन आचरण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, बालकामगार पद्धतीमुळे बालकांचे बालपण कोमेजून जाते. त्यांचे भविष्य घडविणे आपली जबाबदारी आहे. बालकामगार पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांबाबत समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे. शिक्षण खाते आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडे सर्व बालकांचा तपशील असतो. गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित मुलांना शोधले पाहिजे. ग्रामीण भागात अशा मुलांची संख्या आजही अधिक आहे. अशा ठिकाणी शिक्षक, पंचायत विकास अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्त्या यांनी मिळून अशा मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

बालकामगार पद्धतीचे परिणाम लक्षात आणून देण्यासाठीच जागतिक बालकामगार दिन जाहीर करण्यात आला आहे. बालकामगार केवळ त्यांचे हक्कच नव्हे तर आपल्या जीवनातील मूल्येही हरवून बसतात. हे थोपविण्यासाठी प्रत्येक घटकाने पुढे यायला हवे. भारतात बहुसंख्य मुले आपला शैक्षणिक हक्क, आरोग्य आणि मूलभूत स्वातंत्र्य यापासून वंचित आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त बालकामगार आहेत, असे कामगार खात्याचे उपायुक्त नागेश डी. जे. यांनी सांगितले. धोकादायक वातावरणामध्ये बालकामगार काम करतात. याशिवाय त्यांना अन्य गैर कामासाठीही वापरले जाते. भारतीय घटना प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क स्पष्ट करते. भारतामध्ये बाल आणि किशोर कामगार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे बालकामगार आढळले तर त्यांचे संरक्षण करून कायद्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

यावेळी महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक आर.नागराज यांनी खात्याने अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या साहाय्याने ग्रामीण भागातील बालकामगारांना शोधले असून त्यांचे रक्षण केले आहे. त्यामुळे या पद्धतीला बराच आळा बसल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांना न्या. मुरलीमोहन रेड्डी यांनी बालकामगार पद्धत निर्मूलनाची शपथ दिली. कामगार खात्याचे साहाय्यक आयुक्त एम. बी. अन्सारी, शिक्षण खात्याचे उपसंचालक मोहनकुमार हंचाटे, समाज कल्याण खात्याचे उपसंचालक नवीन शिंत्रे, मागासवर्गीय विभागाच्या अधिकारी शिवप्रिया कडेचूर, बालरक्षण अधिकारी महांतेश बजंत्री, परिशिष्ट वर्ग कल्याण अधिकारी बसवराज कुरीहुली, महानगरपालिकेचे उपायुक्त उदयकुमार तळवार, बेळगावचे कामगार अधिकारी मल्लिकार्जुन जोगूर, तरन्नुम बेंगाली, महिला कल्याण समिती अध्यक्ष सिस्टर मेरी, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णवर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. बालकामगार योजना संचालक ज्योती कांते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Advertisement
Tags :

.