For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संतिबस्तवाड गावच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार

09:20 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
संतिबस्तवाड गावच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार
Advertisement

संतिबस्तवाडकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी मोर्चाद्वारे मागणी : स्थानिक वाहनधारकांना प्रवेशबंदी

Advertisement

वार्ताहर /किणये

व्हीटीयू येथून संतिबस्तवाड गावाकडे रस्ता जातो. मात्र विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने दोन ठिकाणी गेट बंद करून संतिबस्तवाड गावच्या वाहनधारकांना या रस्त्यांवरून जाण्यास प्रवेशबंदी केली आहे. गावच्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करण्यास स्थानिकानाच प्रवेशबंदी केली. यामुळे आपल्याच भागातील रस्त्यावरून आम्हाला ये-जा करता येत नाही. आम्ही गावच्या मुख्य असलेल्या या रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या संतिबस्तवाड गावच्या नागरिकांनी सोमवारी व्हिटीयूवर मोर्चा काढला. पूर्वी जांबोटी-चोर्ला रोड संतिबस्तवाड क्रॉस येथून संतिबस्तवाड गावाकडे जाणारा रस्ता होता. या रस्त्यावर मुंगेत्री नदीचे जुने पूलही आहे. ही वाहतूक अगदी सुरळीतपणे सुरू होती. संतिबस्तवाड क्रॉसनजिक विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतरही संतिबस्तवाडचे नागरिक, वाहनधारक या मुख्य रस्त्यावरून संतिबस्तवाड गावाला ये-जा करीत होते. संतिबस्तवाड क्रॉस व्हीटीयूकडे जाताना प्रवेशद्वारावर एक गेट बसविण्यात आले आहे. तर व्हीटीयूची हद्द संपताना दुसरे गेट बसविण्यात आले आहे. 2019 साली  कोविडमुळे नागरिकांना या रस्त्यावरून प्रवेश बंद करण्यात आला. त्यानंतर संतिबस्तवाड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व काही सदस्य यांनी व्हीटीयूच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटून याबाबत माहिती दिली. तसेच स्थानिक नागरिकांना ये- जा करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र या मागणीकडे युनिव्हर्सिटी प्रशासनाने दुर्लक्ष केले.

Advertisement

शैक्षणिक विद्यापीठ आहे. युनिव्हर्सिटीमधून मोठी वाहने ये-जा केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे वाहने बंद करण्यात आली आहेत, असे विद्यापीठाचे अधिकारी सांगत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. मात्र विद्यापीठाच्या निर्मितीनंत0र 15 वर्षे सुरू असलेला रस्ता अलिकडच्याच काळात का बंद करण्यात येत आहे? असा सवाल संतिबस्तवाड गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठाच्या निर्मितीनंतरही या मुख्य रस्त्यावरून गावाकडे जाणाऱ्या, बसेस, खासगी वाहने धावत होती. यामुळे संतिबस्तवाडच्या स्थानिक नागरिकांनाही सोयीस्कर ठरत होते. मात्र कोविडनंतर इथली बस व मोठ्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक नागरिक संतापलेले आहेत. संतिबस्तवाड नर्सरीच्या बाजूला संतिबस्तवाड गावात जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे गावाकडे ये-जा करताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच व्हीटीयूमध्ये राष्ट्रीय बँक व पोस्ट ऑफिस आहे. तसेच संतिबस्तवाड गावातील बऱ्याच महिला व्हीटीयूमध्ये कामाला येतात. या साऱ्यांना व्हीटीयूमधून बस व वाहतूक बंद केल्यामुळे चालत ये-जा करावी लागत आहे.

स्थानिक नागरिकांची वाहतूक बंद केल्यामुळे संतिबस्तवाड गावच्या नागरिकांनी सोमवारी व्हीटीयूवर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. संतिबस्तवाड गावच्या वाहनधारकांना व्हीटीयूच्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करण्याची मुभा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन व्हीटीयूचे कुलपती विद्याशंकर, आर. ई. रंगस्वामी यांच्याकडे देण्यात आले. आमच्या गावाकडे मुख्य रस्त्यावरून आमची अडवणूक का केली जात आहे. आम्हाला या रस्त्यावरून वाहतूक करण्याची सोय करून द्यावी, असे उपस्थित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरुन सांगितले. यावेळी आपल्याला थोडा वेळ द्या, याबाबत विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे रंगस्वामी यांनी सांगितले. संतिबस्तवाड क्रॉस, बेळगाव-चोर्ला क्रॉस व्हीटीयूजवळ नागरिक मोर्चा काढणार यामुळे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आलेल्या ग्रामस्थांनी व्हीटीयूच्या प्रशासनाला आठ दिवसाची मुदत दिली आहे. आठ दिवसात यावर योग्य तो तोडगा काढून गावाकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा पुढील वेळेस बेळगाव-चोर्ला मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी चन्नीकोपी, उपाध्यक्ष मलपुरी जिडीमनी, विठ्ठल अंकलगी, सचिन कबूर, अश्फाक ताशीलदार, मल्लिकार्जुन शिरसंगी, रामा पाटील, महादेव बिर्जे, प्रकाश कर्लेकर, धाकलू कर्लेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यापीठाच्या वरिष्ठांनी त्वरित तोडगा काढावा...

या भागात व्हीटीयूची निर्मिती करण्यात आली. यामुळे परिसराचा विकास होऊ लागला आहे. मात्र पूर्वीपासून संतिबस्तवाड गावाकडे जो रस्ता जात होता. त्या रस्त्यावरच स्थानिकांनाची अडवणूक करण्यात येत आहे. याचा आम्हा गावकऱ्यांना अधिक त्रास होऊ लागला आहे. व्हीटीयूच्या अधिकाऱ्यांना आम्ही सातत्याने याबद्दल सांगत आलो आहोत. तरीदेखील प्रवेशबंदी सुरू आहे. या रस्त्यासंदर्भात दि. 22 रोजी झालेल्या ग्रा. पंचायतीच्या सभेतही चर्चा झाली. त्यानंतर आम्ही मुख्य रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करणार होतो. मात्र पोलिस प्रशासनाने आम्हाला रास्ता रोको आंदोलन करू नका, तुम्ही निवेदन देऊन तुमची मागणी करा आणि यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा, असे सांगितल्यामुळे आज केवळ मोर्चा काढून निवेदन दिले आहे. विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिकांना न्याय द्यावा.

 - भरमा गुडूमकेरी

Advertisement
Tags :

.