शक्तीपीठ विरोधात १२ रोजी मुंबईत एल्गार मोर्चा
माजी खासदार राजू शेट्टी : १२ जिल्ह्यातील शेतकरी होणार सहभागी
सांगली
प्रस्तावित नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी बुधवारी १२ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शक्तीपीठ बाधित शेतकरी, नागारिकांचा एल्गार मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली. मोर्चामध्ये शक्तीपीठ बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागारिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला आमचा ठाम विरोध आहे. शक्तीपीठ महामार्ग हा मोठा घोटाळा असून यामध्ये मोठे अर्थकारण आहे. मूठभर ठेकेदार, उच्चपदस्थ अधिकारी आणि काही राजकीय लोकांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. मात्र, आमचा महामार्गाला विरोध आहे. शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा महामार्ग नसून तो काही जणांना पोसण्यासाठीचा आहे.
ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गासाठी शासन एक रुपायाही देणार नाही. महामार्ग झाल्यानंतर टोलच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा धंदा आहे. समृध्दी महामार्गामुळे आमदारांना ५० कोटी रूपये मिळाले. आता शक्तीपीठ महामार्गामुळे आमदारांना १०० कोटी रूपये मिळणार असल्याचा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला. शक्तीपीठ महामार्गाचा एकूण प्रस्तावित खर्च हा ८६ हजार कोटी रुपये धरलेला आहे. मात्र, हा खर्च दीड लाख कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. एकूण ८०२ कि.मी. लांबीचा हा महामार्ग आहे. सहा पदरी महामार्गाला एक कि.मी. साठी ३५ कोटी ऊपये खर्च येतो. मात्र, शक्तिपीठ महामार्गाला १ कि.मी. साठी सुमारे १०८ कोटी रुपये खर्च येणार आहे. ठेकेदार, उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय लोक यांचाही यामध्ये वाटा आहे. आणि हीच शक्तीपीठ महामार्गात गोम आहे.
ते म्हणाले, सध्याचा रत्नागिरी-नागपूर हा प्रचलित महामार्ग चांगला आहे. या महामार्गावर फारशी रहदारीही नाही. टोलनाकेही मर्यादित आहेत. मग शक्तीपीठ महामार्ग कशासाठी असा सवाल उपस्थित केला. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे टोलनाका आहे. या टोलनाक्यावर दररोज ४० लाख रुपये टोलच्या माध्यमातून येणे अपेक्षित आहे. असे असताना प्रत्यक्षात मात्र, दररोजचे ७ ते ७ लाख रुपये वसूल होतात. त्यामुळे रत्नागिरी-नागपूर हा समांतर महामार्ग वाहनांअभावी रिकामा असताना शक्तीपीठ महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे बुधवार दि. १२ मार्च रोजी शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भारतीय किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, संदीप राजोबा, उमेश एडके यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.