अकरा वर्षाच्या मुलाला ‘जीबीएस’ची लागण
कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय (सीपीआर) मध्ये गिलेन बारे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचा आणखी एक रूग्ण दाखल झाला आहे. अकरा वर्षाच्या मुलाला जीबीएसची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. गुरूवारी रात्री त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जीबीएस रूग्णांची संख्या तीन झाली आहे.
दाखल केलेल्या बालकाला गेल्या चार दिवसापासून पायातील ताकत कमी झाली असल्याचा त्रास होत होता. हातापायात मुंग्या येणे, मळमळणे आदी लक्षणे दिसून येत होती. त्याच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्याच्यावर उपचाराचा फारसा परिणाम होत नव्हता. त्रास वाढतच गेल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्याची अधिक तपासणी केली असता त्याला जीबीएस झाल्याचे निदान झाले. येथील डॉक्टरांनी त्याला जीबीएसवर प्रभावी असणारी ‘इमिनोग्लोबलिन’ उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.