अकरा हजार शिक्षकांची भरती करणार
शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची विधानसभेत माहिती
बेळगाव : राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 11 हजार शिक्षक भरतीची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी दिली. प्रश्नोत्तराच्या तासात हरिष पुंजा यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्यात 41 हजार 088 सरकारी प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये 1 लाख 78 हजार 925 शिक्षकांची पदे मंजूर झालेली आहेत. यापैकी 1 लाख 33 हजार 345 शिक्षक उपलब्ध आहेत. 45 हजार 590 शिक्षकांची पदे रिक्त आहेत, अशी माहिती दिली.
राज्यात 5024 सरकारी प्रौढशाळा आहेत. यामध्ये 44 हजार 144 शिक्षकांची पदे मंजूर झालेली आहेत. सध्या 32 हजार 010 शिक्षक उपलब्ध आहेत. 12 हजार 134 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. प्राथमिक शाळेसाठी 40 हजार व प्रौढशाळेसाठी 11 हजार अशी एकूण 51 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. काँग्रेस सरकारने 13 हजार शिक्षकांची भरती केली आहे. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयीन तिढा संपवून 11 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
राज्यातील कोणतीही सरकारी शाळा बंद करणार नाही, अशी ग्वाही शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी विधानसभेत दिली. शरणू सलगार यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सरकार काही शाळा बंद करणार आहे, अशी बातमी पसरली आहे, हे योग्य नाही. आम्ही कोणत्याच शाळा बंद करणार नाही. सीमाभागात एकटा विद्यार्थी असला तरी शिक्षकाची नियुक्ती करून ती शाळा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.