Elephant Attack News | पोळगाव-एरंडोळ शिवारात हत्तीने मांडले ठाण; जेसीबी मशीनची केबिन फोडली, शेतकरी भयभीत
आजरा -गेल्या तीन दिवसांपासून हत्तीने पोळगांव-एरंडोळ दरम्यानच्या शिवारात ठाण मांडले आहे. दिवसभर चाळोबा जंगली परिसरात थांबून राहणारा हा हत्ती सांयकाळी शेती-शिवारात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून या परीसरात असलेल्या हत्तीने शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे. शिवाय घरालगत लावण्यात आलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी करून नुकसान केले आहे.
आजरा तालुक्यातील पोळगांव-एरंडोळ मार्गालगत असलेल्या राजाराम होलम, दशरथ होलम, भिमराव चौगुले यांच्या शेतातील ऊस पिकाचे नुकसान केले आहे. तर संभाजी नार्वेकर यांच्या घरालगत लावण्यात आलेली ट्रॅक्टर ट्रॉली हत्तीने पलटी करून टाकली आहे. तर बाजूला लावण्यात आलेल्या नार्वेकर यांच्या जे. बी. मशिनची केबीन फोडून नुकसान केले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून हत्ती या परीसरात धुमाकूळ घालत असून हतीने पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
दोन दिवसांपासून मोसमी पावसाला प्रारंभ झाला आहे.
त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्याबरोबरच रोप लावणीसाठी शेती तयार करण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे.मात्र हत्ती थेट शिवारात येऊन धुमाकूळ घालत असल्याने पोळगांव व एरंडोळ येथील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने हतीचा ताबडतोब बंदोबस्त करावा ब झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.