गुंजीसह परिसरात हत्तींचा उपद्रव सुरुच
भात कापणी, मळणीलाही वेग : ऐन सुगी हंगामातच हत्ती दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ : वनखात्याचे साफ दुर्लक्ष
वार्ताहर/गुंजी
गेल्या पंधरा-वीस दिवसापासून गुंजीसह परिसरात दाखल झालेल्या हत्तींचा उपद्रव सुरुच असून, दररोज वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घालून भातपिकांचे नुकसान करणे हे त्यांचा दिनक्रमच बनला असल्याने येथील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. ऐन सुगी हंगामातच हत्ती दाखल झाल्याने वर्षभर इतर जंगली प्राण्यांपासून रक्षण केलेले आणि काबाडकष्ट करून पिकवलेले भात धान्य सध्या हत्ती राजरोसपणे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत खाऊन नुकसान करत आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून कापोली, शिंदोळी, जटगा, डिगेगाळी, त्यानंतर गुंजी कामतगा भटवाडा, सध्या संगरगाळी, भालका शिंपेवाडी आदी भागात हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. भालके के. एच. येथील शेतकरी निंगो आळवणे यांच्या भातगंजीचे तर विठ्ठल आळवणे यांच्या उभ्या पिकाचे बुधवारी रात्री हत्तींनी नुकसान केले आहे.
गुरुवारी सायंकाळी शिंपेवाडीजवळच्या शिवारात हत्तींनी शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील नागरिकांनी आरडाओरडा करून हत्तींना जंगलात पिटाळले. त्याचबरोबर सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा हत्तींनी शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील शेतकऱ्यांनी आणि गावातील नागरिकांनी एकत्र जमा होऊन जोरदार आरडाओरडा करून पुन्हा त्यांना पिटाळल्याचे समजते. मात्र हत्ती तात्पुरते जंगलात गेले असले तरी, अंधाराचा फायदा घेऊन पुन्हा ते शिवरात घुसणारच अशी चर्चा शेतकऱ्यातून चर्चिली जात आहे.
भात कापणी, मळणीच्या ऐन सुगी हंगामातच हत्ती दाखल झाल्याने सध्या या भागात दररोजचा हत्तीचा धुमाकूळ सुरू असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. त्यामुळे आपले भातपीक हत्तींच्या तावडीतून सुरक्षित ठेवण्यासाठी कापणी, मळणी करून घरी नेण्याच्या धडपडीत आहे. केव्हा कुठे हत्ती येतील याचा नेमच नसल्याने सर्वच शेतकरी वर्ग सुगी कामात गुंतल्याने मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडत असून मजुरीतही वाढ झाली आहे. येथील येथील अनेक शेतकऱ्यांची मुले कामधंद्यानिमित्त पर राज्यात आहेत अशा लोकांनी येथील मजुरांचा तुटवडा पाहून तेथूनच मजूर आणून कापणी आणि मळणी काम सुरू केली असल्याचे शेतक्रयातून सांगितले जात आहे.