For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हत्तींच्या उपद्रवामुळे नारळ-सुपारी बागांचे मोठे नुकसान

01:02 PM Jun 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
हत्तींच्या उपद्रवामुळे नारळ सुपारी बागांचे मोठे नुकसान
Advertisement

तळकट -कट्टा परिसरातील शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील तळकट कट्टा परिसरातील शेतकरी सध्या हत्तींच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत. मागील चार वर्षांपासून वन्य हत्ती या परिसरात सातत्याने प्रवेश करत असून, महेश जानबा देसाई यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये आवर्जून जात आहेत. त्यामुळे नारळ आणि सुपारीच्या बागांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकऱ्यांची उपजीविका संकटात सापडली आहे.महेश जानबा देसाई यांनी सांगितले की, "माझ्या बागेत हत्ती वारंवार येतात आणि सुपारीच्या तसेच नारळाच्या झाडांना हानी पोहोचवतात. झाडे मोडतात, फळे खातात, बागेतील संरचना उद्ध्वस्त करतात. या बागेवरच आमचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. आता हीच बाग नष्ट होत असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे."हत्तींचा हा उपद्रव केवळ देसाई यांच्या बागापुरताच मर्यादित नसून, संपूर्ण तळकट कट्टा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी अशाच प्रकारच्या समस्या मांडल्या आहेत. अनेक वेळा वनविभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. हत्तींच्या या नियमित आगमनामुळे बागायती शेतीचा व्यवसाय धोक्यात आला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिस्थितीत सरकारने आणि वनविभागाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. "शासनाने नुकसान भरपाई तत्काळ द्यावी आणि हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे," असे देसाई यांनी नमूद केले.दोडामार्ग तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी यासाठी एकत्र येत प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. हत्तींच्या या सततच्या हल्ल्यांना आळा बसला नाही, तर येत्या काळात शेतकरी शेती सोडण्याच्या विचारात येतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.