बुक्क्याळ, कौलगे गावात हत्तीकडून मोठे नुकसान
ट्रॅक्टर ट्रॉलीसह बैलगाडी उलटली : केळी, ऊस, मका पिकेही फस्त : भीतीचे वातावरण
वार्ताहर/उचगाव
कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीतील चंदगड तालुक्यातील वैजनाथ डोंगरालगत असलेल्या बुक्क्याळ, कौलगे गावालगत असलेल्या शेतवडीमध्ये ठेवलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली व बैलगाडी चाळोबा गणेश हत्तीने उलटून मोठे नुकसान केले आहे. याबरोबरच शेतवडीतील केळीची झाडे, ऊस, मका या पिकांचेही धुडगूस घालून नुकसान केल्याने या भागात शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सांगितलेली अधिक माहिती अशी, गेल्या एक महिन्यापासून बेळगाव तालुक्यातील बेकिनकेरे, अतिवाड, उचगाव, बसुर्ते, कोनेवाडी भागात सातत्याने या चाळोबा गणेश हत्तीने मोठी दहशत घातली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या बुक्क्याळ व कौलगे गावच्या शेतवडीतील शिवाजी बिर्जे यांच्या बार्देशकर नावाच्या शेतवडीमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली ठेवली होती.
या ट्रॉलीमध्ये काही शेतकरी रात्रभर गव्यांच्या कळपांना हुसकावून लावण्यासाठी आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी रोज झोपत होते. मात्र सध्या पाऊस सुरू झाल्याने सदर शेतकरी घरीच होते. याच दरम्यान रात्री हत्तीने या भागात धुडगूस घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. शेतवडीतील ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून टाकल्याचे चित्र दिसून येत होते. तसेच शेतवडीत असलेली केळीची झाडे, स्वीटकॉर्न मक्याचे पीक, ऊस, भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यावेळी चंदगड तालुक्यातील वनरक्षक प्रशांत आवळे यांनी तातडीने हत्तीने नुकसान केलेल्या घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र एकंदरीत झालेल्या प्रकारामुळे शेतकरी हातबल झाला आहे.