सिरसंगी-यमेकोंडमध्ये हत्तीचा धुमाकूळ
किणे :
तालुक्यातील सिरसंगी व यमेकोंड परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून हत्तीचा धुमाकूळ सुरूच आहे. रोज सुमारे एक एकरामधील उसाचे नुकसान हत्ती करत असून यामध्ये शेतकऱ्यांचे हजारो ऊपयांचे नुकसान होत आहे.
आजरा कारखान्याने शिरसंगी सेंटरवऊन 8 पैकी चार ऊसतोड मजुरांच्या टोळ्या हलवल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कारखान्याने त्वरित ऊसाची उचल करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. शिरसंगी परिसरात सुमारे 18 हजार टन ऊस उत्पादन होत असून त्यातील आजरा साखर कारखान्यास 5 हजार टनाची उचल झाल्ााr आहे. अजून 6 ते 7 हजार टन ऊस या परिसरात शिल्लक आहे. पण हत्ती रात्रभर ऊस पिकाची नासधूस करत असल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे.
वन विभागाचे कर्मचारी फक्त रात्री रस्त्यावर गस्त घालत असून हत्ती मात्र शिवारात मुक्तपणे फिरत आहे व पिकांचे नासधूस करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी ऊस पिकांचे नुकसान पाहावे लागत आहे. सुरेश सावंत यांच्या शेतातील गोठ्यामध्ये असलेली कडबाकुट्टी मशीन हत्तीने सोंडेने बाहेर फेकून दिली तर गणू सावंत यांच्या तोडलेल्या उसाच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरत असताना रात्री आठ वाजता अचानक हत्तीने हल्ला करून यामध्ये ट्रॉली पलटी घातली व शिडीची मोडतोड केली. हत्तीच्या या हल्ल्यामुळे ऊसतोड मजुरांनी सैरावैरा धावत गाव गाठले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.या घटनेमुळे ऊसतोड मजुरांतही भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेले काही दिवस शांत असलेला हत्ती आता मोठमोठी काजू, नारळाची झाडे व इतर झाडे मुळासकट उपटून टाकत आहे. त्यामुळे होणारे नुकसान हे फार मोठे असून शेतकरी हतबल झाला आहे. वन विभागाने त्वरित हत्तीला हुसकावून लावावे, अशी मागणी चाळू सावंत, गणू सावंत, पांडुरंग होडगे, दत्तात्रय होडगे, दत्तात्रय देसाई, विलास राजाराम, उत्तम होडगे, भीमराव राजाराम, आनंदा कसेकर, नामदेव कसेकर, नामदेव तिबिले यांनी केली आहे.