संगरगाळीत हत्तीचा धुमाकूळ, भात पिकाचे नुकसान
वार्ताहर/गुंजी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून संगरगाळी येथे हत्तींनी धुमाकूळ घातला असून कापणीस आलेल्या उभ्या पिकात शिरून खाऊन तुडवून लोळण घेऊन प्रचंड नुकसान केले तर काही शेतकऱ्यांनी कापणी करून भातगंजी घातली होती. अशा भातगंजा विस्कटून टाकून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसापासूनच गुंजीसह परिसरातील भालके, कामतगा, जटगा, डिगेगाळी, कापोली, शिंदोळी आदी भागामध्ये दररोज नुकसान केले जात आहे. सध्या त्यांनी आपला मोर्चा संगरगाळी गावाकडे वळविला असून गेल्या दोन-तीन दिवसापासून या भागातील भात पिकाचे नुकसान करीत आहेत.
येथील शेतकरी महादेव पाटील, नारायण पाटील यांच्या कापणी करून रचून ठेवण्यात आलेल्या भातगंजा विस्कटून खाऊन तुडवून नुकसान केले. तर शंकर मनोळकर यांच्या कापणीस आलेल्या उभ्या पिकात शिरून भातपीक खाऊन तुडवून आणि लोळण घेऊन नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. गेले दोन दिवस अंधार होताच तीन हत्ती व दोन पिल्ले असलेल्या पाच हत्तींचा कळप शिवारात शिरत आहे. काही शेतकऱ्यांनी सदर कळपाला हुसकावण्याचाही प्रयत्न केला असला तरी पुन्हा पुन्हा ते शेतात उतरतच असल्याने शेतकरी हताश होत आहेत.
शेतकरी व हत्तींनाही धोका
हातातोंडाशी आलेले भातपीक डोळ्dयादेखत हती खात असल्याने अनेक शेतकरी हत्तींना बॅटरीचा प्रकाशझोत व फटाके लावून हुसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शेतकऱ्यांचा डोळा चुकून हत्ती पिकाचे नुकसान करीत आहेत. वास्तविक सदर शेतजमिनी रेल्वे ट्रॅकजवळ असून सदर हत्तींना रेल्वेचाही धोका संभवतो. त्यामुळे अरण्य खात्याने शेतकरी आणि हत्तींना असलेला हा संभाव्य धोका ओळखून सदर हत्तींना येथून पिटाळून लावावे, अशी मागणी येथील शेतकरी वर्ग करीत आहे.गतवर्षीही जंगली प्राण्याकडून भात पिकाचे नुकसान झाले होते. अरण्य खात्याच्यावतीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वेळोवेळी विचारणा करूनही अद्याप गतवर्षीची भरपाई मिळाली नसल्याचे येथील शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे.