महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुंजी परिसरात हत्तीचा धुमाकूळ

10:55 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भात गंज्यांचे नुकसान : शिवारातील भातमळणी करणे बनले कठीण 

Advertisement

वार्ताहर/गुंजी

Advertisement

गेल्या पंधरा दिवसांपासून मडवाळ, घोटगाळी भागातून कापोलीमार्गे आलेल्या हत्तींनी सध्या गुंजी परिसरात ठाण मांडले आहे. गेल्या चार दिवसांपासून गुंजी परिसरातील कामतगा, वाटरा, भालके, भटवाडा आदी भागांमध्ये भात पिकाबरोबरच भातगंज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या या भागातील भातकापणी अंतिम टप्प्यात असली तरी ऐन सुगी हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे सुगी हंगाम लांबणीवर तर पडलाच. शिवाय पावसामुळे पाणथळ शिवारातील भातमळणी करणे कठीण बनले आहे. त्यातच या भागात हत्तींनी धुमाकूळ घातला असून दररोज वेगवेगळ्dया भागातील भातपीक आणि भातगंजींचे नुकसान करीत असल्याने येथील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. भटवाडा येथील शेतकरी शंकर चौगुले, धनाजी चौगुले, रेणुका शहापूरकर, तर कामतगा येथील ज्ञानेश्वर घाडी, नारायण घाडी, मारुती जोशीलकर, वामन नाईक, पांडुरंग नाईक, अशोक गवाळकर, शिवाजी गवाळकर तसेच भालके येथील शांताराम आळवणे यांच्या भातगंजींचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ओलाव्यामुळे मळणीत अडचणी

या भागामध्ये भातकापणीपाठोपाठ हत्तींच्या दहशतीमुळे मळणी करणे सुरू आहे. मात्र यावर्षी पाऊसमान जास्त झाल्याने शिवारात अद्यापही दलदल आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना भातमळणी करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी भातगंज्या रचून ठेवल्या आहेत. मात्र गेल्या चार दिवसापासून या भागामध्ये आलेल्या हत्तींच्या कळपाणी भातगंज्या खाऊन टाकण्याचा सपाटाच सुरू केल्याने हातातोंडाशी आलेले भातपीक सरळ सरळ हत्तीच्या पोटात जात असल्याने येथील शेतकरीवर्ग हताश झाला आहे. वर्षभर काबाडकष्ट करून, जंगली प्राण्यांशी संघर्ष करून शेवटी कापून रचून ठेवलेले भातपीक हत्ती फस्त करत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या या भागामध्ये जवळजवळ दहा हत्ती वास्तव्यास असून हा कळप विखुरलेला आहे. यातील चार ते पाच हत्तींनी सोमवारी भटवाडा येथील शेतकऱ्यांच्या भातपिकाचे प्रचंड नुकसान केले. गुंजी व भालकेच्या मधोमध असलेल्या तळपांडे जंगलात हत्ती विश्रांती घेत असल्याचे मंगळवारी दुपारी येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदर हत्ती पुन्हा रात्री गुंजी किंवा भालके येथे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच यातील चार हत्ती कामतगा-जोमतळा भागात वावरत असून एक हत्ती आंबेवाडी भागात फिरत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article