गुंजी परिसरात हत्ती हटाव मोहीम तीव्र
सोमवारी दिवसभर राबविली मोहीम : लोंढा वनाधिकाऱ्यांचा पुढाकार : हत्तींनी गुंगारा दिल्याने संभ्रम
वार्ताहर/गुंजी
गेल्या पंधरा-वीस दिवसापासून हतींनी गुंजी परिसरातील गुंजीसह भालके बि. के, भालके के एच, नायकोल, भटवाडा, कामतगा आदी भागात हैदोस घालून ऊस, केळी, सुपारी, नारळ आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी तरुण भारतच्या माध्यमातून होत असल्याने लोंढा वनाधिकारी तेज वाय. पी. यांनी याची दखल घेत सोमवारी दिवसभर नायकोल, भालका, भटवाडा या जंगलामध्ये हत्ती हटाव मोहीम हाती घेतली. त्याकरिता लोंढा वनविभागातील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या दोन तुकड्या केल्या.
नायकोल आणि भालके जंगलामध्ये हत्तींचा शोध सुरू झाला. अखेर भटवाडा जंगलामध्ये पिलांसह पाच हत्तींचा कळप निदर्शनास आला. त्यानंतर दोन्ही तुकड्या एकत्र येऊन हत्तींना पिटाळण्याचे काम सुरू झाले. भटवाडा गावच्या रस्त्याची संपूर्ण नाकेबंदी करून हत्तींना कामतगा जंगलाकडे हाकण्याचे काम सुरू असतानाच दुपारी पिलासह असलेला एक हत्ती बिथरला. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये थोडा गोंधळ उडाला. नेमका याच संधीचा फायदा घेऊन हत्तींनी वन कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन हत्ती जंगलात गायब झाले. हत्तींना पुन्हा शोधण्याचा प्रयत्न झाला मात्र जंगलात हत्ती दृष्टीस पडले नाहीत. त्यामुळे सदर मोहीम अर्धवट सोडूनच वनखात्याला माघारी फिरावे लागले.
वनाधिकाऱ्यांना हत्तींचा गुगारा : आज पुन्हा शोध सुरू
या विषयी लोंढा वनाधिकारी तेज वाय. पी यांना विचारले असता हत्तींनी गुंगारा दिल्याचे त्यांनी कबूल केले. त्यानंतर जंगलात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र हत्तींचा सुगावा लागला नाही. सध्या संध्याकाळ होत आली असून पुन्हा उद्या सकाळी हत्तींचा शोध घेऊन हत्तींना मोठ्या जंगलाकडे पिटाळण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. तसेच रात्रीच्या वेळी कोणीही जंगल भागाकडे जाऊ नये असेही त्यांनी आवाहन केले. या मोहिमेत लोंढा वनाधिकारी तेज वाय. पी. सह गुंजी सेक्शन फॉरेस्टर राजू पवार, वाय. एस. पाटील, कामतगा बीटगार्ड विनायक बोंबीलकर आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
भालके गावात हत्तींचा धुडगूस रविवारी सायंकाळी भालके गावात सदर हत्तींचा कळप शिरुन परसातील केळीची आणि नारळाची झाडे मोडून नुकसान केले. त्यानंतर याची चाहूल नागरिकांना लागताच गावातील नागरिकांनी हत्तींना जंगलात पिटाळून लावले. त्यावेळी आठ हत्ती असल्याचे भालके गावच्या नागरिकांतून सांगितले जात आहे. सोमवारी भटवाडा जंगलात केवळ पाचच हत्तींचा कळप निदर्शनास आला. उर्वरित हत्ती नायकोल भागाकडे असल्याचे बोलले जात आहे. स्थानिकांचे सहकार्य घेऊन मोहीम राबविल्यास यश निश्चित मिळेल.