इलिना रायबाकिना ऑस्ट्रेलियन स्पर्धेची नवी राणी
मर्टन्स-झेंग महिला दुहेरीत, स्कुपेस्कि-हॅरीसन पुरुष दुहेरीत अजिंक्य
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2026 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत शनिवारी कझाकस्तानच्या इलिना रायबाकिनाने बेलारुसच्या टॉप सिडेड आर्यना साबालेंकाचा पराभव करत पहिल्यांदाच महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील रायबाकिना ही नवी सम्राज्ञी ठरली. तसेच महिला दुहेरीचे अजिंक्यपद इलेसी मर्टन्स आणि झेंग शुई यांनी पटकाविले. अमेरिकेचा ख्रिस्टन हॅरिस आणि ब्रिटनच्या निल स्कुपेस्किने पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत रविवारी सर्बियाचा माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविच आणि स्पेनचा कार्लोस अल्कारेझ यांच्यात पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या रायबाकिनाने टॉप सिडेड साबालेंकाचा 6-4, 4-6, 6-4 अशा तीन सेट्समधील लढतीत पराभव करत जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत रायबाकिना जेतेपद मिळविणारी कझाकस्तानची पहिली टेनिसपटू आहे. रायबाकिनाच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. 2022 साली रायबाकिनाने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. 26 वर्षीय रायबाकिनाला या सामन्यात जेतेपद मिळविण्यासाठी तब्बल 2 तास 18 मिनिटे झगडावे लागले. या सामन्यात तिने 28 विजयी फटके मारले. 2001 आणि 2002 साली या स्पर्धेचे जेतेपद मिळविणारी जेनिफर कॅप्रियेतीच्या हस्ते रायबाकिनाला जेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. 2023 साली साबालेंकाकडून रायबाकिनाला पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाची परतफेड तिने यावेळी केली. गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत साबालेंकाने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली होती. गेल्या वर्षी या स्पर्धेत अमेरिकेच्या मॅडिसन किजने साबालेंकाचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले होते. तत्पूर्वी साबालेंकाने 2023 आणि 24 साली सलग दोन वेळेला ही स्पर्धा जिंकली होती.
शनिवारच्या अंतिम सामन्यात रायबाकिनाने पहिला सेट 6-4 असा जिंकल्यानंतर साबालेंकाने आपल्या डावपेचात बदल करत बेसलाईन खेळावर अधिक भर दिला. आणि त्याचा तिला लाभही मिळाला. साबालेंकाने दुसरा सेट 6-4 असा जिंकून रायबाकिनाशी बरोबरी साधली. अपेक्षेप्रमाणे तिसरा सेट अधिकच चुरशीचा झाला. मात्र रायबाकिनाने या सेटमध्ये साबालेंकाची 2 वेळा सर्व्हिस भेदत आघाडी घेतली आणि तिने ही आघाडी शेवटपर्यंत राखत हा सेट 6-4 असा जिंकून साबालेंकाचे आव्हान संपुष्टात आणले. फोरहँड फटक्यावर रायबाकिनाने आपला शेवटचा विजयी गुण नोंदविला. रायबाकिनाचा जन्म मॉस्कोमध्ये झाला. पण त्यानंतर तिने कझाकस्तानमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 2018 पासून ती आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात कझाकस्तानचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2022 च्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत रायबाकिनाने अंतिम सामन्यात जेबॉरचा पराभव करत पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविले होते.
मर्टन्स-झेंग विजेते
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात इलेसी मर्टन्स आणि झेंग शुई या चौथ्या मानांकित जोडीने अंतिम सामन्यात अॅना डॅनिलिना व अॅलेवस्सेंड्रा व्रुनिक यांचा 7-6 (7-4), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. मर्टन्स आणि शुई यांचे या स्पर्धेतील पहिले विजेतेपद आहे. बेल्जियमची मर्टन्स आणि चीनची शुई यांनी या अंतिम सामन्यात दर्जेदार खेळ केला. पण व्रुनिक आणि डॅनिला यांनी पहिला सेट टायब्रेकरपर्यंत लांबविला. पहिला सेट 55 मिनिटे चालला होता. मात्र दुसऱ्या सेटमध्ये मर्टन्स आणि शुई यांनी आपली सर्व्हिस अधिकवेळ राखत व्रुनिक आणि डॅनिला यांचे आव्हान संपुष्टात आणले. मर्टन्सचे हे सहावे तर झेंगचे हे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
स्कुपेस्कि-हॅरिसन विजेते
अमेरिकेचा ख्रिस्तेन हॅरिसन आणि ब्रिटनचा निल स्कुपेस्कि या जोडीने पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पहिल्यांदाच पटकाविले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात स्कुपेस्कि आणि हॅरिसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या जेसन कुबलेर आणि मार्क पोलमन्स यांचा 7-6 (7-4), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हॅरिसनचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद असून स्कुपेस्किचे मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीतील चौथे विजेतेपद आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या कुबलेर आणि पोलमन्स या जोडीला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता.
जोकोविच-अल्कारेझ आज अंतिम लढत
या स्पर्धेत रविवारी पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी सर्बियाचा माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविच आणि स्पेनचा कार्लोस अल्कारेझ यांच्यात अंतिम लढत होत आहे. आधुनिक टेनिस क्षेत्रात जोकोविचने आत्तापर्यंत 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून तो आता विक्रमी 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. जोकोविचने आत्तापर्यंत 10 वेळेला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीतच अल्कारेझला पराभूत केले होते. रविवारचा अंतिम सामना 5 सेट्समध्ये होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. 39 वर्षीय जोकोविचने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत आत्तापर्यंत 10 वेळेला अंतिम फेरी गाठली असून त्याने या अंतिम लढती जिंकल्या आहेत. गेल्या वर्षी या स्पर्धेत इटलीच्या सिनरने जेतेपद मिळविले होते. पण यावेळी जोकोविचने सिनरचा 3-6, 6-3, 4-6, 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली तर अल्कारेझने जर्मनीच्या व्हेरेव्हचे आव्हान 5 सेट्समधील लढतीत संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.