वडूज येथे इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाची आत्महत्या
वडूज :
खटाव तालुक्यातील वडूज येथील धान्य बाजार पेठेतील एका इलेक्ट्रॉनिक व्यावसायकाने स्वत:च्या दुकानात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. संजय जोतीराम गोडसे उर्फ बंटी असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
शुक्रवारी दुपारी बारा ते साडेचार या वेळेत त्यांनी त्यांच्या मालकीच्या समर्थ इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात फॅन अडकवण्याचा अँगलला गळफास घेतला होता. दुपारी राहत्या घरी जेवण करण्यासाठी ते आले नाहीत. त्यामुळे घरची लोक पाहण्यासाठी गेले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत गोडसे यांचा लटकता मृतदेह आढळून आला. या प्रकरणी त्यांचा मुलगा अभिषेक गोडसे याने वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर वडूज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळावू स्वभावाच्या बंटी यांनी आत्महत्या केल्याबद्दल परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.